Kishori Pednekar On Raj Thackeray Meet Eknath Shinde : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? या भेटीचं कारण काय? खरंच ही सदिच्छा भेट होती का? अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या भेटीवर आता शिवसेना ठाकरे गटाची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं. ‘राज ठाकरेंनी काही कामानिमित्त भेट घेतली असावी, त्यामुळे आम्ही जास्त मनावर घेण्याचं कारण नाही’, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवर शिवेसना ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “राज ठाकरे यांचं जर काही काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे हे त्याचं काम करत असतील तर आम्ही जास्त मनावर घेण्याचं कारण नाही. त्यांचं काही काम असू शकतं. आता उद्या महापालिकेच्या संदर्भात समजा आमचं एखादं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निघालं किंवा त्याबाबत आम्हाला बोलायचं असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतो. त्यामुळे या भेटीत जास्त काही नाही”, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं?
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने पाहणी केली आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

