सिंधुदुर्गात सापडलेल्या दुर्मिळ ब्लॅक पँथरसाठी थरारक ‘मिशन’, अखेर बछडं आणि आईची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या दुर्मिळ ब्लॅक पँथरचा बछडा आणि त्याच्या आईच्या भेटीसाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवली.

black panther found in water tank
सिंधुदुर्गमध्ये सापडलेला ब्लॅक पँथर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील गोवेरी-तेंडोली येथे 11 नोव्हेंबर रोजी दुर्मिळ असणारा ब्लॅक पँथर आढळला. तो विजय प्रभूखानोलकर यांच्या आंबा/काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडला होता. अखेर यशस्वीपणे सुटका करून या ब्लॅक पँथरला त्याच्या आईची भेट घडविण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग वनविभागाने पुणे येथील वन्यजीव बचाव पथकच्या सहाय्याने ही अद्वितीय कामगिरी 13 नोव्हेंबर रोजी पार पाडली.

11 नोव्हेंबर रोजी गोवेरी येथे हा काळ्या रंगाचा बिबट्या पडल्याची माहिती मिळताच कुडाळ वनपरिक्षेत्राचे बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टाकीत पाहाणी केली असता तो (ठिपक्याचा) नियमित बिबट नसून, काळ्या रंगाचा असल्याची खात्री झाली. यानंतर बचाव पथकाने शिताफीने पाऊल उचलत या बिबट्याची सुटका करण्याच्या हालचालींना वेग दिला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ७ ते ८ फूट विहिरीमध्ये पिंजरा सोडत त्यास पिंजऱ्यात घेत सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्या ब्लॅक पँथरची पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ यांच्याकडून वैदयकिय तपासणी केली. यात हे बछडं सदृढ असल्याची खात्री झाली.

बछड्या ब्लॅक पँथरची आईशी भेट घालून देण्यासाठी खास ‘मिशन’

मादी प्रजातीच्या या ब्लॅक पँथरचे वय सुमारे ८ ते १२ महिने आहे. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन महाराष्ट्र राज्य सुनिल लिमये तसेच मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनवृत्त कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांचे मार्गदर्शनाखाली त्या बछडयाच्या आईचा शोध घेत पुर्नभेट (Re-Union) करून देण्याचे निश्चित करणेत आले. त्यानुसार उपवनसंरक्षक (प्रा.) वनविभाग सावंतवाडी शहाजी नारनवर यांनी त्यावर निर्णय घेत तशा सुचना वनपरिक्षेत्र कुडाळचे बचाव पथकास दिल्या.

ठिक-ठिकाणी कॅमेरा ट्रॅपचा वापर

12 नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने पुणे येथील या टीमच्या मदतीने कुडाळ वनविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये रेस्क्यु करण्यात आलेल्या मादी बछडयाच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची खात्री होताच ठिक-ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत त्याच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात केली.

बछड्याने पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या कोंबडीला आपले भक्ष्य बनवले

वनविभागाच्या क्षेत्रात मादी (आईचा) वावर दिसून येताच तिथे बछडा व आई यांची भेट करून देण्याच्या कार्यवाहीला वेग आला. ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले. तत्पूर्वी निरीक्षणाखाली व निगराणीखाली असणाऱ्या बछड्याने पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या कोंबडीला आपले भक्ष्य बनवत तिचे मांस खाल्ल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.

… आणि बचाव पथकाच्या आशा पल्लवित

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वनपरिक्षेत्र कुडाळ बचाव पथकाने बिबट्याच्या बछड्याची तपासणी करुन त्यांच्या आईचा वावर असलेल्या परिसरात बछड्यास पिंजऱ्यासहीत नेण्यात आले. तिथे पुणे टीमची बिबटयाच्या प्रतिसादाची प्रतिक्षा सुरू झाली. अथक प्रयत्नाने रात्री उशिरा आईने पिंजऱ्यातील आपल्या पिल्लाचा अंदाज घेतला, पण हुलकावणी देत तिथून ती पसार झाली. पिंजऱ्याजवळ येऊन तिने दर्शन दिल्याने बचाव तथकाच्या आशा पल्लवित झाल्या.

पुन्हा जोमाने १३ नोव्हेंबर रोजी सकाळपासून आई व बछडा यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान उपवनसंरक्षक (प्रा) वनविभाग सावंतवाडी हे स्वतः रात्री उपस्थित होते. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४० च्या सुमारास आई पिंजऱ्यातील पिल्लाजवळ येताच पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा पिल्लू आईला बिलगले व आपला उर्वरीत आयुष्याचा आनंदी प्रवास पुनःश्च सुरु करण्यासाठी गेले.

ब्लॅक पँथर ही बिबट्या प्रजातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती

ब्लॅक पँथर ही बिबट्या प्रजातील अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात मेलॅनिन (Melanin) रंगद्रव्य (Pigments) तयार झाल्याने व जनुकिय बदलांमुळे त्याचा रंग काळा दिसून येतो. जिल्ह्यातील या अतिशय दुर्मिळ अशा काळ्या रंगाच्या बिबट्याचे (ब्लॅक पँथर) वनविभागाने यशस्वी रेस्क्यू केल्याने सिंधुदुर्गाचे वैभव व वेगळेपण सांगणारा हा अत्यंत दुमिळ ब्लॅक पँथर सिंधुदुर्गातील जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत गेला. या ब्लॅक पँथरची सिंधुदुर्गातील जंगलात त्याच्या आईची भेट घडवून दिल्याने वनविभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : आई आली, पण पिलाला न घेताच गेली!

बचावकार्य व पुर्नभेट मोहीम प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन महाराष्ट्र राज्य सुनिल लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनवृत्त कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेट बेन, उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी आय. डी. जालगावकर तसेच मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार व महादेव भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यात वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ अमृत शिंदे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षिरसागर, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ अण्णा चव्हाण, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे, वनरक्षक मठ सूर्यकांत सावंत वाहनचालक राहुल मयेकर यांचा सहभाग होता. RESQ पुणे संस्था व स्थानिक ग्रामस्थांनी देखील यात मदत केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know about how rescue and re union mission of black panther happen in sindhudurg pbs

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या