Pandharpur Wari Significance : आषाढीची वारी म्हटलं की, सर्वांना टाळ-मृदूंग यांच्या गजरात, अभंग-ओव्यांच्या नामसंकीर्तनात दंग झालेले, माऊलीच्या दर्शनाची आस डोळ्यात बाळगून मैलोनमैल पायी प्रवास करणारे वारकरी आठवतात. दरवर्षी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून हजारो-लाखो वारकरी पंढरपूरला जातात. या वारीच्या काळात पालखी सोहळ्याला विशेष महत्व असते. दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीतून पंढरपूराकडे रवाना होते. पण या पालखीचे महत्त्व काय आहे आणि दिंडीला पालखीची जोड कधीपासून मिळाली हे तुम्हाला माहिती आहे का? इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी या कितीतरी वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे.
दिंडी म्हणजे काय?
सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिंडी म्हणजे काय हे समजावून देताना सदानंद मोरे म्हणाले की, “ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराज यांच्या पर्यंतची वारीची परंपरा म्हणजे गावोगावचे लोक पंढरपूरला जायचे. ते कसे जायचे? तर वारी ही वैयक्तिक पातळीवरची साधना मार्गातील उपासना नाही. वैयक्तिकरित्या तुम्ही कधीही पंढरपूरला जाऊ शकता, तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण त्याला तुम्ही वारी म्हणणार नाही. वारी ही एक सामूहिक उपासना आहे. म्हणजे पंढरपूरपर्यंत समूहाने जायचं आणि आशा समूहाला आपण दिंडी म्हणतो. दिंडी म्हणजे वारीचा लहान घटक.”
दिंडीचे स्वरूप कसे असते याबद्दल बोलताना मोरे म्हणाले की, “दिंडीत एक असा माणूस असतो ज्याच्या गळ्यात वीणा असतो, ज्याला आपण विणेकरी म्हणतो. तो या सगळ्या दिंडीचे संचलन करतो. त्याच्या इशार्याप्रमाणे लोक जातात, थांबतात, अभंग म्हणतात, विशिष्ट पद्धतीने नामस्मरण करतात. तो जो वीणा वाजवतो त्या संपूर्ण गायनाला एक आधार स्वर मिळत जातो. त्याच्याशी मिळता जुळता स्वर लावून जे वाद्य वाजवलं जातं त्याला पखवाज म्हणतात, ते ताल वाद्य आहे. आणखी लोक असतात, ते किती असावे याचा नियम नाही. दोन-चार किंवा दहा- शंभर किंवा जास्तही लोक असू शकतात. त्यांच्या गळ्यात टाळ असतो.”
दिंडीला पालखीची जोड कशी मिळाली?
दिंडीत पालखीला कधीपासून स्थान मिलालं १६८० साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच बादशाह औरंगजेबाच्या डोक्यात संपूर्ण भारतात मोगलांची सत्ता स्थापन करण्याचा विचार होता. तेव्हा दक्षिणेत तीन राजवटी होत्या. एक विजापूरची आदिलशाही, दुसरी गोवळकोंड्याची कुतूबशाही आणि तिसरी राजवट ही शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे होतं. हे नष्ट करण्यासाठी तो आला. आदीलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही त्याने संपवून टाकली, त्यानंतर राहिलं स्वराज्य. तर संपूर्ण औरंगजेबाच्या सैना सागराने महाराष्ट्रात धुमाकूळ माजवला. मराठ्यांच्या ताब्यात किल्ले राहिनात अशी ती अवस्था होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी लढत दिली, राजाराम महाराज, ताराबाई यांनी लढत दिली. या काळात नारायण महाराज (संत तुकाराम महाराज यांचे पुत्र) यांच्या लक्षात आलं की हे फार महान संकट आहे. त्यामुळे इथल्या लढणाऱ्या सैनिकांचे आणि राज्यकर्त्यांचे नीतीधैर्य खचता कामा नये, आपल्या चालू असलेल्या कामाला आणखी काळानरूप वेगळं स्वरूप दिलं पाहिजे, ज्यामुळे लोकांची परंपरेवरची निष्ठा कायम राहिली पाहिजे, त्यांना एक बळ मिळालं पाहिजे, ईश्वरी अधिष्ठान आहे असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांनी दिंडीला पालखीची जोड दिली, असे सदानंद मोरे यांनी सांगितले.
दिंडीत पालखीचा समावेश करण्यामागे विचार काय होता?
तुकाराम महाराजांची वारकरी पंथाची परंपरा त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी पुढे चालवली. त्यांचा दिंडीबरोबर पालखी सुरू करण्यामागील विचार काय होता? याबद्दल सदानंद मोरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात एक गोष्ट रुढ झाली होती की वारकरी सांप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि याचा कळस तुकोबानी केला. दरम्यानच्या काळात पंढरपूरचे असेच महान भागवत भक्त होते प्रल्हादबुवा बडवे, मग त्यांना याला अनुसरून ज्ञानोबा-तुकाराम हे भजन रुढ केलं. याला एक प्रत्यक्ष रुप द्यावं असं नारायण बाबांना वाटलं, मग त्यांनी काळाच्या एकूण समजुतीनुसार, एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त मान द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्याला त्या काळात पालखीत बसवलं जायचं. समाजात सर्वोच्च मान असलेला माणूस म्हणजे कोण तर जो पालखीत बसतो. ज्ञानोबा-तुकाराम देह रुपात नव्हते, मग त्यांनी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवल्या. त्यानंतर वारकर्यांच्या दिंडीबरोबर पालखी निघू लागली, म्हणजे आपम ज्ञानोबा-तुकाराम यांच्याबरोबर पंढरपूरला आपण वाटचाल करत आहोत.”