Story of Panduranga Vitthal and Pundalik : चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरपूर येथे पांडुरंग विठ्ठल विटेवर उभा आहे. कित्येक युगं लोटली तरी तो तसाच उभा आहे. दरवर्षी या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रातील सर्व कोपर्यांमधून वारकरी मोठ्या भक्तीने पंढरपूरात येतात. पण हा परमेश्वर विठ्ठल नेमका कोण आहे? आणि तो विटेवर कसा उभा राहिला यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सह्याद्री या वाहिनीला काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत विठ्ठल विटेवर उभा राहण्यांसंबंधीची आख्यायिका सांगितली आहे.
इतिहासात वारकरी पंथाचे दाखले
महाराष्ट्रात रुजलेल्या वारकरी सांप्रदायाची मुळं समाजात किती खोलवर रुजलेली आहेत याबद्दल माहिती देताना सदानंद मोरे सांगतात की, “१३व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, गोरोबा काका, सावता महाराज, जनाबाई असे अनेक संत होऊन गेले. १३वे शतक म्हणजे महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळीच, या १३ व्या शतकातील सर्व संतांनी विठ्ठलाचा, पंढरपूरचा, पंढरीच्या आणि वारीचा वारंवार उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये केला आहे. त्याकाळचे शिलालेख, ताम्रपट यामध्ये देखील याचा उल्लेख दिसून येईल. महानुभाव सांप्रदायाचे जे साहित्य आहे – लीळाचरित्र, स्मृतिस्थळ या साहित्यात देखील या गोष्टींचे उल्लेख वारंवार सापडतील. १३व्या शतकात वारकरी सांप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित संप्रदाय महाराष्ट्रात होता असे आपण नि:संशयपणे म्हणू शकतो. त्याला जणू काही एका स्वातंत्र्य धर्माचे स्वरूप प्राप्त झाले होते,” असेही सदानंद मोरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “याच्या मागे जेव्हा आपण जातो तेव्हा शंकराचार्यांनी ‘पांडुरंग अष्टकम’ हे पांडुरंगाचे स्त्रोत रचलं. शंकराचार्यांचा काळ हा साधारणपणे आठवं शतक मानला जातो. त्यामुळे आपण नि:संशय म्हणू शकतो की आठव्या शतकापासून पांडुरंगाचे आणि पंढरपूरचे संदर्भ मिळतात, असेही मोरे यांनी नमूद केलं.
पांडुरंग या देवतेचे स्वरूप काय आहे?
पंढरपुरातील पांडुरंग हा कोण? आणि तो नेमका कुठून आला याबद्दलच्या आख्यायिका सदानंद मोरे यांनी या मुलाखतीत सांगितली. “पंढरपूरतील विठ्ठल दैवत म्हणजे, द्वारकेहून पंढरपूरला आलेला श्रीकृष्ण. ही गोष्ट महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित आहे की, पुंडलीक नावाचा व्यक्ती होता आणि तो त्याच्या आई वडीलांच्या सेवेत मग्न होता. विठ्ठलाला वाटलं की आपण त्याला भेट द्यावी, त्याला हवं-नको ते विचारावं आणि त्याप्रणाणे श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेहून पंढरपूरला आले. हा त्या सेवेत गर्क झालेला होता. त्याला विचारलं की मी आलो आहे आणि तुला काय पाहिजे? परमात्मा श्रीकृष्ण समोर उभा असताना पुंडलिकाने सांगितलं की मी माझ्या आई वडीलांची सेवा करतो आहे, तोपर्यंत तू इथे उभा राहा. म्हणून त्याने जवळची वीट घेतली आणि त्याला विटेवर उभं केलं,” असे ते म्हणाले.
पांडूरंग विटेवरच उभा राहिला याबद्दल मोरे यांनी एक उदाहरण देखील दिलं. “आपल्याला लहान मुलांचा खेळ माहिती आहे, मुलं खेळता-खेळता कुठल्यातरी एकाला ‘स्टॅच्यू’ असं सांगतात. जणू काही पुंडलीकाने श्रीकृष्णाला तिथं उभं केलं आणि सांगितलं की ‘स्टॅच्यू’… की तू आता इथेच उभा राहा आणि तिथे विठ्ठल म्हणजेच कृष्ण, हा मूर्ती रुपाने तिथं उभा राहिला. अशा प्रकारे श्रीकृष्णाचं आगमन द्वारकेहून पंढरपूरला झालं आणि त्याला पुंडलिकानं मूर्तीरुपाने विटेवरती उभं केलं,” असे सदानंद मोरे म्हणाले.