सावंतवाडी : यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा मोठा फटका कोकणातील आंबा पिकाला बसला असून, बागायतदारांच्या हाती केवळ १० ते १५ टक्केच उत्पादन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोहोराची झालेली गळती आणि तो काळा पडल्याने उत्पादनात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट झाली असून, आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे.
युद्धाचा निर्यातीवर सावट:
देवगड आणि रत्नागिरीचा हापूस जगभरात प्रसिद्ध असला, तरी यंदा आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होण्याची चर्चा आहे. या संदर्भात देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक संतोष पाटकर यांनी माहिती दिली की, देवगडचा हापूस थेट परदेशात निर्यात न होता वाशी बाजारपेठेतून मागणीनुसार पाठवला जातो. यंदा उत्पादन कमी असल्याने आंबा परदेशात निर्यात झाला नाही तरी देशांतर्गत बाजारपेठ मिळवणे शक्य आहे.
स्थानिक बाजारपेठेचे महत्त्व:
कोरोना काळातील अनुभवाचा दाखला देत पाटकर म्हणाले की, “त्यावेळी वाहतूक ठप्प असतानाही देवगड हापूसने महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ काबीज केली होती. कर्नाटक आणि बंगळुरूचा आंबा महाराष्ट्रात येऊ शकला नाही, ज्याचा फायदा आपल्या हापूसला झाला. आम्ही थेट चंद्रपूरपर्यंत आंबा विक्री करून बाजारपेठ विस्तारली होती.” कृषी विभागाने केवळ परदेशी बाजारपेठेचा विचार न करता देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील बाजारपेठेचे नियोजन करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
हेक्टरी ५ लाखांच्या मदतीची मागणी:
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ‘आक्रोश मोर्चा’तून करण्यात आली होती. या मोर्चात पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले होते.
विधीमंडळ अधिवेशनात निर्णयाची प्रतीक्षा:
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत या विषयावर बैठक पार पडली आहे. सध्या सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी विशेष नुकसान भरपाई जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्व बागायतदारांचे डोळे लागले आहेत.
बनावट हापूसचे संकट:
कर्नाटक आणि बंगळुरू येथील आंबा काही विक्रेते देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या नावाने विकतात, अशी खंतही बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहकांनी अस्सल हापूस ओळखणे हे आता मोठे आव्हान ठरत आहे.
देवगड येथील हापूस आंबा सध्या प्रति नुसार देवगड मध्ये एक डझन १२०० ते २४०० रूपयांचा दर लावला आहे. तो परिपक्व करून वाहतूक आणि पॅकिंग करून विक्रीचा दर निश्चित केला जातो, असे संतोष पाटकर यांनी बोलताना सांगितले.
