सावंतवाडी: निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य सरकारने तातडीने या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हेक्टरी ५ लाख रुपये मदतीचा निर्णय उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करावा. अन्यथा, १२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. वेंगुर्ला येथे आयोजित आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावर्षी आंबा हंगामाला अवकाळी पाऊस, मोहोर गळती, तापमानातील चढ-उतार आणि फळमाशीचा मोठा फटका बसला आहे. देवगडसह अनेक भागात मोहोर करपल्याने उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाली असून कीटकनाशकांचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, राज्य सरकारने पंचनामे करण्यापलीकडे कोणतीही ठोस मदत केलेली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यात आंबा व काजू बागायतदारांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी. आंबा पिकासाठी हेक्टरी ५ लाख आणि काजूसाठी ३ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. बोगस औषधे, खते व कीटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांची कृषी विभागामार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र उभारून एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, अशा असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणचा शेतकरी इतक्या मोठ्या अडचणीत आला आहे. जर शासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर १२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या मेळाव्यात एकमताने घेण्यात आला. यावेळी देवगड तालुका बागायतदार संघाचे अध्यक्ष काका डोके, संजय गावडे, संजय नाईक, गणेश गायकर, किरण ठेंबले, सौ. प्रिया परब, राजेंद्र गडयान्नावर, तुषार पालकर यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
