कोकण आणि गणेशोत्सव यांचे नाते अगदी घट्ट आहे. परंपरा, संस्कृती आणि साधेपणा जपत साजरा होणाऱ्या कोकणातल्या गणपती उत्सवाचे आकर्षण साऱ्यांनाच आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणाच्या दिशेने धावणाऱ्या एसटी, खासगी बस, वाहने, रेल्वे यांतून लाखो भाविक आपापल्या गावाकडे कूच करतात. खरं तर तोही गणेशोत्सवापूर्वीचा सोहळाच जणू. आणि प्रत्येक सोहळ्याचं ‘इव्हेंटीकरण’ करण्याचं कसब राजकीय पक्षांना साध्य आहे. यंदाही तेच पाहायला मिळत आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने ५७४१ बस सोडल्या आहेत. त्यातील अर्ध्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वखर्चाने आरक्षित केल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यातल्या २९०० बस ‘बुक’ केल्या आहेत. या बसमधून अर्थातच कोकणवासीयांसह फुकटे पर्यटकही भरपूर आहेत. कोकणात जाणाऱ्या भाविकांचे इतके लाड का, असा प्रश्न राज्यातील अन्य प्रदेशांतील नागरिकांना आता पडू लागला आहे.

कोकणातला प्रमुख उत्सव असल्याने लाखोंच्या संख्येने मुंबई-ठाण्यातून जाणाऱ्या नोकरदारांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे योग्यच. मात्र, ही सुविधा चांगला महामार्ग, नियमित रेल्वेगाड्या, रो-रोसारखी जलवाहतूक, विमानसेवा या माध्यमातून उभारण्याची गरज आहे. प्रत्यक्षात कोकणवासीयांची जादा एसटी बसवर बोळवण करण्यात येते. त्यासाठी राज्यातल्या अन्य आगारांच्या बसगाड्या कोकणात पाठवण्यात येतात. त्यामुळे राज्यभरातील जनतेला वाहतुकीचा खोळंबा सोसावा लागतो. एसटी महामंडळासमोरही हे मोठे आव्हान असते. एसटी महामंडळाचे होणारे करोडो रुपयांचे नुकसान, चालक-वाहक यांची हेळसांड, उर्वरित कोकणातील एसटी प्रवाशांचे अतोनात हाल आणि मुंबई-गोवा महामार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी हे सर्व प्रश्न पुढील चार दिवसांसाठी निर्माण होतील. मात्र, याचा विचार कोणी करत नाही. कारण राजकीय पक्षांच्या डोळ्यांसमोर तरळत असते कोकणची दुबार मतपेढी.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची पहिली सत्ता १९९५ मध्ये आली. त्यावेळी एकट्या कोकणात शिवसेनेचे २४ आमदार निवडून आले. त्याच जोरावर शिवसेना-भाजपची पहिल्यांदा सत्ता आली होती. कोकणची ही मतपेटी जपण्याचा प्रयत्न एकसंध शिवसेना आणि आता शिवसेना शिंदे पक्षाकडूनही जिवापाड केला जातो. गणेशोत्सवासाठी राज्यातील इतर भागांतील एसटी बस कोकणात वळविणे हा त्याचाच एक भाग आहे. या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पालघरमधील चाकरमानी मतदार खूश होतात; तर आपली भावकी गणेशोत्सवासाठी सुखरूप घरी आली म्हणून कोकणातील मंडळी आनंदित होतात. एकाच योजनेचा फायदा दोन्ही बाजूच्या मतदारांनाही आणि राजकीय व्यवस्थेलाही होत आहे.

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटीची विशेष वाहतुकीची ही परंपरा गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ जुनी आहे. पूर्वी एखाद्या गावातील जबाबदार ग्रामस्थ तीन महिने आधी जवळच्या एसटी आगारात जाऊन बस आरक्षित करीत असे. त्यासाठी मुंबईत गाव मंडळांच्या बैठका होत. या आरक्षणातून गावातील भावकी, प्रेम, जिव्हाळा आणि एकोपा वाढत असे. एकतर्फी प्रवासासाठी महामंडळ जास्त तिकीट दर आकारून गाड्या सोडते. ती पद्धत आजही आहे. यावेळी एसटीने तीस टक्के एका बाजूच्या प्रवासासाठी जादा दर आकारण्याचे जाहीर केले होते. शिंदे यांच्या दबावानंतर तो रद्द केल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मात्र, यामुळे एसटी महामंडळाचे जे नुकसान होणार आहे त्याची भरपाई कोण करणार, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाही.

गणेशोत्सवात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या पूर्वी दीडशे-दोनशे असायची. मात्र, गेल्या पाच वर्षांत, विशेषत: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ही संख्या हजाराच्या घरात गेली. शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ‘आनंदाचा शिधा’ सुरू केला होता. त्यामध्ये पाच जीवनावश्यक वस्तू दिल्या जात होत्या. लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक तोंडमिळवणीत ही योजना बंद पडली. त्याची उणीव भरून काढण्यासाठी आता राजकीय पक्षांकडून गणेशोत्सवासाठी लागणारे विविध साहित्य कोकणातील गणेशभक्तांना दिले जात आहे. आता फक्त गणेशमूर्ती देणे बाकी आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया एका राजकीय नेत्याने व्यक्त केली. या एका प्रतिक्रियेत या राजकीय ‘रेवडी’चे संपूर्ण गणित सामावले आहे.

या सगळ्या राजकीय आणि भावनिक गणिताची किंमत एसटी महामंडळाला मोजावी लागत आहे. गेल्या वर्षी या विशेष वाहतुकीमुळे महामंडळाचे सुमारे आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा हे नुकसान १२ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीसाठी हा खर्च अधिक गाळात नेणारा आहे.

वाहक, चालकांचे हाल कोण पाहते?

राज्याच्या विविध भागांतून कोकणात आणले जाणारे चालक-वाहक सलग अनेक तास वाहन चालवतात. त्यांचा मुक्काम, विश्रांती, आरोग्य आणि कामाचा अतिरिक्त ताण याकडे लक्ष दिले जात नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी. हजारो एसटी बस, खासगी बस आणि लाखो खासगी वाहने एकाच वेळी कोकणाच्या दिशेने धावल्याने महामार्गावर प्रचंड ताण येतो. रखडलेले महामार्गाचे काम, अपूर्ण रस्ते, वाहतुकीचे अडथळे आणि त्यात गणेशोत्सवाची गर्दी यामुळे मुंबई-ठाणेकरांना गाव गाठण्यासाठी पाच तासांच्या प्रवासासाठी दहा ते बारा तासांचा प्रवास करावा लागतो.

कोकणातील गणेशोत्सवासाठी विशेष एसटी गाड्या सोडण्यास कोणीही विरोध करत नाही. यापूर्वीही अशी सवलत दिली जात होती, पण राजकीय फायद्यासाठी मोफत बस सेवा देणे योग्य नाही. कोकणच्या मतपेढीला खूश करण्यासाठी एसटीची आर्थिक कंबर मोडणे, इतर भागांतील प्रवाशांना बसपासून वंचित ठेवणे, चालक-वाहकांच्या आरोग्याशी तडजोड करणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढवणे यावर राजकीय मंडळींनी विचार करणे आवश्यक आहे. गणेशभक्त सुखरूप घरी पोहोचला पाहिजे, त्यासाठी दरवर्षी हजारो बस कोकणात वळविण्याऐवजी कायमस्वरूपी आणि सक्षम वाहतूक व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. राजकीय ‘व्होट बँक’ जपण्यासाठी वाटली जाणारी ही ‘रेवडी’ लोकप्रिय असली, तरी तिचा आर्थिक भार अखेर एसटी महामंडळ आणि सर्वसामान्य प्रवाशांच्याच माथी येत आहे.