अलिबाग– कोकणात जून महिन्यात सरासरी ३७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या महिन्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तूलनेत यंदा ४३ टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र राज्यातील इतर भागांच्या तूलनेत कोकणातील पावासाचे प्रमाण जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे.
कोकणात किती पावसाची नोंद ?
कोकणात जून महिन्यात सरासरी ६६२ मिलीमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत यावर्षी ३७८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. म्हणजेच जून महिन्याच्या सरासरी पावासाच्या तुलनेत यंदा ५७.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा मोसमी पावसाच्या वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत. जून महिन्याच्या सूरवातीला राज्यात दाखल होणारे मोसमी वारे यंदा उशीराने दाखल झाले. दाखल झाल्यावरही पावासाचा जोर अपेक्षित प्रमाणात वाढला नाही. सुरवातीचे तीन आठवडे तुरळक पावसाची नोंद झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावासाने जोर धरला त्यामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला.
कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस?
जून महिन्यात कोकणात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात नोंदविला गेला. तर सर्वात कमी पाऊस ठाणे जिल्ह्यात झाला. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६५.९ टक्के पावसाची नोंद झाली. तर ठाणे जिल्ह्यात २८.४ टक्के पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी ८८० मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा ४९८ मिमी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी ८१३ मिमी पाऊस पडतो, त्या तूलनेत यंदा ५३६ मिमी पाऊस नोंदविला गेला. रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी ६५५ मिमी पाऊस पडतो पण यंदा ३३५ मिमी पाऊस पडला. पालघर जिल्ह्याची जून महिन्याची पावसाची सरासरी ४१९ मिमी आहे. पण यंदा २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात जून मध्ये ४६१ मिमी पाऊस पडतो. पण यंदा १३१ मिमी पाऊस पडला आहे.
गेल्यावर्षीच्या स्थिती कशी होती?
गेल्या वर्षी जून महिन्यात सरासरीच्या तूलनेत १०१ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र एल निनोच्या प्रभावामुळे पावासाची वाटचाल रखडली असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६.६ टक्के, पालघर जिल्ह्यात ५५ टक्के तर रायगड जिल्ह्यात ५१ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे पुन्हा सक्रीय झाल्याने, पावासाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात कोकण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जून महिन्यातील पावसाची तूट जुलै भरून निघण्यास मदत होईल अशी अपेक्षआ वर्तविली जात आहे.
