सावंतवाडी: कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना मिळालेली तुटपुंजी मदत आणि शासनाचा अनास्थेचा कारभार या विरोधात आता कोकणचा शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख तर काजू बागायतदारांना ३ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी एप्रिल महिन्याच्या अखेरीस गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ असा भव्य धडक मोर्चा काढण्याचा निर्धार बागायतदारांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटाने पिचला आहे. नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाने हेक्टरी ५ लाख व ३ लाख रुपयांची मागणी केली असताना, प्रत्यक्षात सरकारने केवळ २२ हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, अद्यापही या नुकसानीबाबत प्रशासनाने कोणतेही पंचनामे केलेले नाहीत किंवा अधिकृत आदेशही काढलेले नाहीत.
शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारवर दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. एका बाजूला विविध मोठ्या प्रकल्पांसाठी लाखो कोटी रुपयांची तरतूद केली जात असताना, दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत आहेत, मात्र सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
या लढ्याला बळ देण्यासाठी शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुंबईत जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांच्या या मोर्चात सहभागी होऊन आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
या भेटीवेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, गणेश गावकर, किरण टेंभुलकर, अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. आता या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
