पुणे : कोकणातील शाळांतील घटत्या विद्यार्थिसंख्येच्या समस्येची शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दखल घेतली. त्यानुसार नववी आणि दहावीसाठी प्रत्येकी दहा विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक मंजूर करण्यास, तसेच पदवीधर शिक्षकांना प्राथमिकच्या वर्गांना शिकवण्यास मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) कोकण विभागीय मंडळातून दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१२ ते २०२६ या कालावधीत झपाट्याने घटल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. घटत्या विद्यार्थिसंख्येमागे रोजगारासाठी होणारे स्थलांतर या प्रमुख कारणासह कमी झालेला जन्मदर, वाढत्या खासगी शाळा, शाळांबाबत शिक्षण विभागाची धोरणे कारणीभूत असल्यावर तज्ज्ञांनी बोट ठेवले होते. या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी कोकणातील शाळांतील घटती पटसंख्या, शिक्षक समायोजन अशा मुद्द्यांवर बैठक घेतली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल यांच्यासह आमदार किरण सामंत, महेंद्र दळवी, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित असलेले मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत म्हणाले, ‘बैठकीत प्रामुख्याने कोकणातील शाळांतील पटसंख्येबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, सध्याच्या नियमानुसार नववी, दहावीला प्रत्येकी किमान २० विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक उपलब्ध करून दिले जातात. मात्र, आता प्रत्येकी १० विद्यार्थी असल्यासही तीन शिक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, प्राथमिकच्या वर्गांना असलेल्या पदवीधर शिक्षकांना अतिरिक्त करण्यात आले होते. या बाबत पदवीधर शिक्षकही प्राथमिकच्या वर्गांना शिकवू शकतात, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता समायोजनाबाबत दिलासा मिळाला आहे, तसेच तूर्तास परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे.

बैठकीत प्रामुख्याने कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमधील अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोकणातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि शाळांमधील अंतराचा विचार करून शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासन सजग असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शिक्षक समायोजन संदर्भात योग्य मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती भुसे यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली.

कोकणातील अनेक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होत असल्याने शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करणे गरजेचे आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन वेगळे निकष लागू करावेत, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत केली. कोकणातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी उद्योग-रोजगार निर्मितीसाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.- नीतेश राणे, मत्स्य व बंदर विकासमंत्री