अलिबाग – कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. गावोगावी दररोज रात्री होळी लावण्याबरोबरच वेगवेगळया लोककला, पारंपारीक नृत्य, पालखी सोहळे सुरू आहेत. चाकरमानी गावाकडे आल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव रंगपंचमी पर्यत असाच सुरू राहणार आहे. होलिकोत्सवातील पालखी सोहळया दरम्यान शरणे काढण्याची परंपरा आजही दक्षिण रायगडमध्ये जपल्याचे पहायला मिळते.
फाल्गुन पंचमीपासून कोकणात शिमगोत्सवाला सुरूवात झाली. शिमगोत्सवाला कोकणात गणेशोत्सवाइतकेच महत्व आहे. जिल्हयात सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात असला तरी दक्षिण रायगड मधील महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा या तालुक्यांमध्ये होळीचा उत्साह वेगळाच असतो. या भागात तब्बल १५ दिवस होळीचा उत्साह पहायला मिळतो. इथली होळीची परंपरा ग्रामस्थ आजही टिकवून आहेत. दररोज गावाबाहेर मोकळया जागेत होळी लावली जाते. त्यासाठी बच्चे कंपनी घरोघरी जावून लाकूडफाटा, गवत गोळा करते.
होळीचे चारदिवस सरल्यानंतर गावोगावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या घरी दर्शनासाठी बाहेर पडतात. घरोघरी ग्रामदेवतेचे पूजन अर्चन केले जाते. नवस बोलले जातात फेडले जातात. या देवतांना नवस बोलल्यास त्याची पूर्तता होते अशी भाविकांची श्रदधा आहे. त्यासाठी मुंबई पुण्यात नोकरी वयवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी हजेरी लावतात. यादरम्यान पालखी नाचवण्याची कलादेखील कोकणी जनतेने जोपासली आहे. १० ते १२ गावांत फिरून मोठया होमाच्या आदल्या दिवशी होळीच्या ठिकाणी येत असते. त्याला पालखी सानेवर आली असे म्हणतात. तेथे ग्रामस्थांतर्फे देवतेची पूजा केली जाते. या पालखीबरोबर एक संकासूर देखील असतो. होळीच्या मुख्य दिवशी दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम असतात. रात्री मोठया प्रमाणात जंगलातून गोळा केलेला लाकूड फाटा आणि गवत यांनी मोठा होम तयार केला जातो. या होळीची पूजा करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ग्रामस्थ होळीभोवती फेर धरता पुजारी फाग म्हणतो त्यानंतर शिमग्याची बोंब ठोकून तिचे दहन केले जाते. पेटत्या होळीत नारळ टाकून तिला शांत करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी होळीच्या वरच्या टोकाला कोंबडा बांधला जातो.
मोठया होळीनंतर काही ठिकाणी ५ दिवस जागरण केले जाते. वेगवेगळे खेळ खेळले जातात. महिलांची नाचगाणी होत असतात. रंगपंचमीच्या दिवशी सामुहिक रंगपंचमी खेळली जाते. त्याच रात्री मांसाहारी जेवणाचा बेत असतो. रंगपंचमीच्या दिवशी कोकणातील होलिकोत्सवाची सांगता होते.
शरणे म्हणजे काय?
होळीच्या दिवसात ग्रामदेवतांच्या पालख्या गावोगावी फिरत असतात. घरोघरी जावून भाविकांना दर्शन देतात. वर्षातून एकदाच देव आपल्या घरी येत असल्याने मुंबई किंवा अन्यत्र स्थायिक झालेले भाविक ग्रामस्थ आवर्जून देवाच्या स्वागतासाठी हजेरी लावतात. काहीजण आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे किंवा आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवाला साकडे घालतात. पालखीच्या वेळी हे साकडे घालण्याची पदधत वेगळी आहे. ज्या भाविकाला नवस बोलायचा आहे. तो पालखीतील देवासमोरील फूल आणि तांदूळ घेतो त्यासोबत आपल्याकडील नारळ घेतो. या तीन वस्तू कुणाच्याही नकळत एकत्र लपवून ठेवल्या जातात. पालखी नाचवत असताना या वस्तू पालखीचा खूर लावून शोधून काढल्या जातात. जर या वस्तू शोधून काढल्या तर नवसपूर्ती होणार अशी भाविकांची श्रदधा आहे. होळी आणि शिमगोत्सवाचा उत्साह कोकणात टीपेला पोहोचल्याचे गावागावात पहायला मिळत आहे.
