अलिबाग – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे आधीच संकटात सापडलेला कोकणातील आंबा बागायतदार आता पुन्हा एकदा मोठ्या चिंतेत सापडला आहे. हवामान विभागाने कोकण विभागात पावसाचा अंदाज वर्तवला असून, यामुळे बागायतदारांची धडधड वाढली आहे. जर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरातील जिल्ह्यांसाठी अधिकृत हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंबा उत्पादन क्षेत्र किती?
रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील क्षेत्र ४२ हजार हेक्टर आहे. त्यापैकी १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र उतपदनक्षम आहे. मात्र यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याचे उत्पादन आधीच कमालीचे घटले आहे. अनेक भागांत झाडांवर मोजकाच आंबा शिल्लक आहे. त्यातच अजूनही बहुतांश बागायतदारांचा आंबा काढणीचा अंतिम टप्पा बाकी आहे. अशा परिस्थितीत जर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर झाडावर राहिलेला आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडेल, असा भीतीयुक्त अंदाज वर्तवला जात आहे.
दरामध्ये घसरणीची भीती
पावसामुळे केवळ आंबा गळतीचेच संकट नाही, तर बाजारातील गणितेही बिघडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास आंब्याची गुणवत्ता घसरते, डाग पडतात आणि तो सडण्याचा धोका वाढतो. परिणामी, बाजारात आंब्याचे दर कमालीचे कोसळू शकतात. आधीच कमी उत्पादनामुळे आर्थिक अडचणीत असलेला बागायतदार, दर घसरल्यास पूर्णपणे कोलमडून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकरी आणि बागायतदार हवामानाचा अंदाज घेऊन जसा जमेल तसा आंबा उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी लगबग करत आहेत, परंतु, निसर्गाच्या या लहरीपणापुढे आता बागायतदार हतबल झाले असून, सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
बागायतदारांसाठी प्रशासनाचे आवाहन
विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह होणाऱ्या या पावसामुळे आंबा, काजू तसेच काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच वादळाच्या वेळी झाडांखाली किंवा खुल्या मैदानात आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
