अलिबाग -धावते बस मध्ये महिलेचा दोन वेळा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास करत आहे.

गोव्यावरून सुट्टी संपवून मुंबईकडे निघालेल्या एका महिलेसोबत राजधानी ट्रॅव्हल्स मध्ये गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय . एम एच 43 सी के २९८१ या या बस क्रमांक असलेल्या राजधानी ट्रॅव्हल्स मध्ये ही महिला गोव्यावरून काल रात्री मुंबईकडे निघाली होती. मात्र प्रवासात तिच्यासोबत या ट्रॅव्हल्स मधील बस मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कडून दोन वेळा गैर वर्तन करण्यात आले.

रात्री या महिलेला आपल्या सोबत सतत गैरवर्तन होत असल्याचं लक्षात आल्यावर, तीने बस पोलादपूर जवळ असतांना ११२ या पोलीस हेल्प लाईनवर संपर्क साधला. महीलेच्या तक्रारीची गंभीर दखल पोलीस दलाने घेतली. तातडीने महामार्गावरील पोलीसांना अलर्ट देण्यात आला. बस वेगाने मुंबईच्या दिशेने सरकत होती. त्यामुळे कोलाड पोलीसांनी महामार्गावर बंदोबस्त लावला, आणि बसला अडववून सदर महिलेची चौकशी केली.

यानंतर महिलेच्या तक्रारी नुसार बस मधील सहाय्यका विरोधात बी एन एस कलम 74 अंतर्गत महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे नाव होशियार डिगर सिंग कार्की असून तो राहणार उत्तराखंड मधील आहे दरम्यान या घटने बद्दल शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील ट्विट करत या संदर्भात संताप व्यक्त केलाय. महिला छत्रपती संभाजी नगर मधील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी खाजगी बसेस मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.

दरम्यान पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फोर्ने यांनी दिली. दरम्यान नागरीकांनी आपत्कालीन परस्थितीत ११२ क्रमांकावर तातडीन संपर्क साधरण्याचे आवाहन रायगड पोलीसांनी केले आहे.