कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात पुन्हा एकदा संबंधित २० गावांतील सरपंचांनी एकत्र येऊन विरोधात मोट बांधली. कोणत्याही परिस्थितीमध्ये हद्दवाढ होऊ देणार नाही. एक इंचभरही जमीन महापालिका हद्दीत समावेश करू देणार नाही, असा निर्धार त्यांनी गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.
यावेळी वीस गावांतील सरपंच, उपसरपंच सदस्यांची उपस्थिती होती. हद्दवाडी विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याबरोबरच उच्च न्यायालयात जाऊ; पण हद्दवाढ करू देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
कोल्हापूर महापालिका हद्दवाढीमधील प्रस्तावित आठ गावे समाविष्ट करण्याला ग्रामीण भागातून विरोध होत आहे. हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी सरपंच, उपसरपंचांची बैठक बोलावण्यात आली होती. याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
शासनाचे डोळे उघडणार कधी?
यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, हद्दवाढीला २० गावांनी विरोध केला आहे. मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. गाव बंद आंदोलन पुकारले होते. हद्दवाढीचा अट्टाहास कशासाठी, शासनाचे डोळे उघडत नाहीत का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.