चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातांच्या अनेक घटना रोज समोर येताना दिसतात. अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरच्या शहापुरीमधल्या पत्की हॉस्पिटलजवळ हा विचित्र अपघात घडला. यात रिक्षाचालक यू-टर्न घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बाईकस्वाराला धडक बसली. त्यानंतर रिक्षानं पुन्हा गिरकी घेतली आणि पुन्हा दोघांना उडवलं. या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नेमकं घडलं काय?

या अपघाताचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये नेमका अपघात कसा घडला? हे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला संबंधित रिक्षाचालक समोरच्या दिशेनं यू-टर्न घेताना दिसत आहे. पण त्याचवेळी समोरून येणाऱ्या बाईककडे त्याचं दुर्लक्ष झालं किंवा बाईक येण्याआधी आपण यू-टर्न घेऊ शकतो हा आत्मविश्वास रिक्षाचालकाला नडला.

दुसरीकडे समोरून येणाऱ्या बाईकवर बाईकस्वार आणि मागे एक महिला बसली होती. बाईकस्वारालाही रिक्षाच्या यू-टर्नआधी आपण बाजूच्या जागेतून पुढे जाऊ शकतो, त्यासाठी रिक्षाचालक थांबेल, असा विश्वास वाटल्यानं त्यानंही वेगानं बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाचालक थांबला नाही आणि यू-टर्न पूर्ण होण्याआधी बाईकलाही पुढे जायला जागा मिळाली नाही. परिणामी बाईक थेट रिक्षाच्या पुढच्या भागाला धडकली.

https://x.com/RoadsOfMumbai/status/1802200411249770765

ही धडक इतकी जोरात होती की त्यामुळे बाईक धडकून बाजूला पडली, बाईकस्वार खाली पडला आणि मागे बसलेली महिला थेट रिक्षावर जाऊन आदळली. एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे त्या धडकेमुळे रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो थेट ड्रायव्हिंग सीटच्या उजव्या बाजूने खाली पडला.

चालकाविनाच रिक्षानं घेतली गिरकी अन्…

चालक खाली पडल्यावर रिक्षानं त्या वेगात पुन्हा गिरकी घेतली आणि मागून येणारी एक महिला आणि एका पुरुषाच्या अंगावर रिक्षा गेली. त्यांना खाली पाडल्यानंतर रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये शिरली आणि सरतेशेवटी थांबली.

पुणे अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती…..अल्पवयीन कारचालकाने सहा जणांना चिरडले….

या सर्व घटनाक्रमात बाईकवर बसलेले दोघे, स्वत: रिक्षाचालक आणि मागून येणारे दोघे असे तीन पुरुष आणि दोन महिला जखमी झाले आहेत.