कोल्हापूर : शिवकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांचे निधन

संग्रह वाढवितानाच या शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व, विविध संदर्भग्रंथांचे वाचन करुन त्यांनी सखोल अभ्यासही केला होता.

ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव यांचे आज(मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जयसिंगपूर येथे निधन झाले. त्यांनी राज्यभर फिरून शस्त्रांचा विपुल संग्रह केला होता. शिवकालीन शस्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला.

गिरीश जाधव हे मूळचे जयसिंगपूरचे. जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण जाधव हे त्यांचे वडील. त्यांना महाविद्यालयीन दशेपासूनच शस्त्र संग्रहाचा छंद लागला होता. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर भागातील किल्ले, गड येथे भ्रमंती केली होती.

१९८० सालापासून त्यांच्यातील शस्त्रास्त्र संग्राहाची चुणूक दिसून आली. ते पुणे येथे राहत असताना त्यांना मिळालेली कट्यार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखवली असताना त्यांनी ती शिवकाळातील असल्याचे सांगितले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून शस्त्रसंग्रहाच्या छंदाची दिक्षाच जाधव यांनी घेतली होती. मुंबईतील कुर्ला भागात त्यांनी दीर्घकाळ वास्तव करताना शस्त्र संग्रह वाढवला.
आजवर त्यांनी प्रयत्नसाध्य राहत शस्त्रसंग्रह वाढवला. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे आशीर्वाद त्यांना लाभले होते. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद अशा शहरांतील जुन्या-पुराण्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा ते शोध घेत राहिले. त्यांची निष्ठा पाहून अनेकांनी शस्त्रे त्यांना भेट म्हणून दिली आहेत. संग्रह वाढवितानाच या शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व, विविध संदर्भग्रंथांचे वाचन करुन त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

जमवलेला शस्त्र संग्रह –

त्यांनी जमविलेल्या शस्त्र संग्रहात तलवारी, भाले, गुप्त्या, कट्यारी व सुरा, खंजीर, जंबिया, बिचवा, बर्ची, वाघनखे अशी सुमारे २५ लहान हत्यारे, जुने बाण, तोफेचे गोळे आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महाेत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, लखुजीराजे जाधव प्रतिष्ठान, शाहिर परिषद यासह राज्य आणि देशपातळीवरील विविध संस्था-संघटना तसेच शासन व खासगी ट्रस्टची वस्तू संग्रहालये, पुरातत्व विभागाच्या विविध समित्यांवर ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सक्रिय होते. व्यक्तीगत आणि कौटूंबीक आर्थीक गरजा बाजूला ठेवून त्यांनी गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी इतिहाकालीन शस्त्रास संग्रह, त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचे व्रत जोपासले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kolhapur arms collector girish jadhav passes away msr

ताज्या बातम्या