Kolhapur Bank Election Result: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल (Kolhapur Bank Election Result) हाती आला आहे. निवडणुकीत सत्ताधारी गटानेच विजय मिळवला आहे. मात्र विरोधात असणाऱ्या शिवसेनेने सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पाठीशी असणाऱ्या भाजपालाही जोरदार धक्का दिल्ला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेने आव्हान देत काँटे की टक्कर दिली. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच विजय झाला. सत्ताधारी गटातील ८ उमेदवार तर विरोधी गटातील ४ उमेदवार विजयी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्ताधारी गटातील विजयी उमेदवार

१) राजेंद्र पाटील-यड्रावकर
२) विनय कोरे
३) सुधीर देसाई
४) रणजित पाटील
५) संतोष पाटील विजयी
६) प्रताप उर्फ भैय्या यशवंत माने
७) विजयसिंह अशोकराव माने
८) स्मिता युवराज गवळी

विरोधी गटातील विजयी उमेदवार

१) खासदार संजय मंडलिक
२) अर्जुन अबिटकर
३) बाबासाहेब पाटील आसुरलेकर
४) रणवीर गायकवाड

याआधी सत्तारूढ गटाचे नेते बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक हे सहा जण त्यांच्या तालुक्यातून सेवा संस्था गटातून बिनविरोध विजयी झाले आहेत.

धक्कादायक निकाल

प्राचार्य अर्जुन आबिटकर हे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू हे पतसंस्था, बँका गटातून विजयी झाले. त्यांनी सत्तारूढ गटाचे उमेदवार माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव केला. याच गटात विद्यमान संचालक अनिल पाठवून हेही पराभूत झाले आहेत.

विरोधी गटाचे नेते शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील आसुरलेकर हे दोघेजण पणन मतदारसंघातून विजयी झाले. तर सत्तारूढ गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटचे सहकारी भैय्या माने हेही या निवडणुकीत विजयी झाले. निवडणूक प्रचारकाळात आरोप जोरदारपणे होत राहिले. परंतु निकालानंतर दोन्ही गटाच्या नेत्यानी हस्तांदोलन करून परस्परांचे अभिनंदन केले. हे अभिनंदन होते की पडद्यामागील हातमिळवली अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली.

मी तर शिवसेनेचीच, माजी खासदार निवेदिता माने यांची विजयानंतर प्रतिक्रिया

सत्ताधारी गटाकडून विद्यमान संचालिका, माजी खासदार निवेदिता माने या विजयी झाल्या आहेत. माने आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बँकेचे संचालक सत्तारूढ गटाकडून निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर शिवसेनेतून जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र आज निकालानंतर त्यांनी आपली शिवसेनेची बांधिलकी व्यक्त केली आहे.

पत्नीला उचलून घेत आनंद साजरा

करवीर पंचायत समिती माजी सभापती स्मिता गवळी विजयी ४८८७ मतं मिळाली. विरोधी विश्वास जाधव यांना १४९५ मतं पडली. विजयानंतर त्यांना पतीने मतमोजणी केंद्रात उचलून घेऊन असा आनंद व्यक्त केला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना यांची सत्ता होती. मात्र जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर शिवसेनेने स्वतंत्र आघाडी केली. तर भाजपाने सत्तारूढ गटाबरोबर राहणे पसंत केले. सत्तारूढ गटाचे नेतृत्व बँकेचे अध्यक्ष ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील , सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे करीत होते. तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्तारुढ गटाला आव्हान दिले होते. शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये शेकापच्या मदतीने तीन दिग्गज पक्षांना थेट आव्हान देत कडवं आव्हान दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur district central cooperative bank kolhapur zilla madhyavarti bank election results ncp congress bjp shivsena sgy
First published on: 07-01-2022 at 13:14 IST