दयानंद लिपारे
कृषी, कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, सहकार पर्यटन अशा विविधांगी भक्कम आर्थिक स्रोतामुळे कोल्हापूरची आर्थिक प्रगती गतीने होत आहे. नगदी ऊसशेतीचा फुललेला मळा आणि लागूनच उद्योगांची गतिशील चाके यातून जिल्ह्यात विकासगंगा प्रवाहित झाली आहे. आर्थिक प्रगतीची फळे दीनाघरी पोहोचल्याने दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे. दरम्यान पर्यटन, शेतीच्या क्षेत्रात हवे ते बदल आणि संधी निर्माण न केल्याने विकासाचा हा पट शक्य असून अधिक विस्तारणे शक्य झालेले नाही.




कोल्हापूरच्या काळय़ा मातीत अर्थक्षम होण्याचे गुण आधीपासूनच दिसत आहेत. इथले पुरोगामित्व अर्थविकासाला चालना देणारे आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरण बांधल्याने जिल्हा सुजलाम् सुफलाम् होण्याचे बीजारोपण झाले. त्यांनी उद्यम नगर वसवले; तेव्हाच ‘आत्मनिर्भर’ उद्योगपर्वाला आरंभ झाला. कोल्हापूरच्या आसपास कागल-हातकणंगले पंचतारांकितसह तीन मोठय़ा औद्योगिक वसाहती आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मोठय़ा कंपन्यांची संख्या वाढत आहे. या सोबतीने जिल्ह्यात डझनभर औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांची मालिका आकाराला आली आहे. कोल्हापूरच्या फौंड्री- इंजिनीअिरग उद्योगांनी जगभरात नाममुद्रा उमटवली आहे. इथे होणारे अॅल्युमिनिअमचे कास्टिंग, अलॉय, बेअिरग, ऑइल इंजिन, विविध प्रकारची यंत्रे, कृषी अवजारे या साऱ्यांची आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वमधील देशांत निर्यात होते. यातून आज कोल्हापुरात हजारोंसाठी रोजगारनिर्मिती आणि छोटय़ा उद्योगांची मोठी साखळी तयार झाली आहे. यातून देशाला हुकमी परकीय चलनाची प्राप्ती होते.
अर्थप्राप्तीचे धागे जुळले
‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ अशी ओळख असलेल्या इचलकरंजीचा वस्त्रप्रवास हातमागापासून सुरू झाला खरा. एव्हाना तो देशातील सर्वाधिक विकसित झालेल्या ‘शटललेस’ लूमपर्यंत पोहोचला आहे. यातून विदेशी चलनाची भरभक्कम कमाई होऊ लागली आहे. डझनभर सूतगिरण्यांतील उत्पादनाचा आलेख उंचावत चालला आहे. असे असले तरी, वस्त्रोद्योगाचे बिघडलेले अर्थकारण आणि नवतंत्रज्ञानाचा प्रपात यामध्ये साध्या यंत्रमाग व्यवसायाची मात्र, वाताहत झाली आहे.
या उद्योगाच्या जोडीने कोल्हापुरातील सोन्याची बाजारपेठ, हुपरी येथील चांदीच्या अलंकारांनी स्थानिक अर्थकारणाला गेल्या अनेक वर्षांत झळाळी दिलेली आहे. कोल्हापुरी चप्पल या वैशिष्टय़पूर्ण वस्तूने कोल्हापूरला ओळख आणि अर्थप्राप्ती दिली. कोल्हापूरच्या आजवरच्या प्रगतीत या सर्वच उद्योग व्यवसायांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
काळय़ा मातीत धनाचा अंकुर
कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक जमीन म्हणजे अर्थव्यवस्थेचा भरभक्कम कणा होय. ऊस हे मुख्य पीक. प्रतिएकरी अधिक उत्पन्न, सर्वाधिक साखर उतारा, विक्रमी दराची हमी ही ऊस- साखर उद्योगाची मजबूत वैशिष्टय़े. एकटय़ा ऊस पिकातून जिल्ह्यात या वर्षी ६५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोहोचले आहेत. कोल्हापूरची दुसरी गोड ओळख म्हणजे गूळ. भौगोलिक उपदर्जा मिळालेल्या या चवदार गुळाने देश-परदेशातील बाजारपेठेत आपला गोडवा ढळू दिला नाही. भाताच्या विविध जातींचे उत्पादन हे आणखी एक वैशिष्टय़. येथील पश्चिम भागातील डोंगरदऱ्यांमध्ये भात उत्पादनातून चांगली प्राप्ती होत आहे. सोयाबीनचे एकरी सर्वाधिक उत्पादन याच जिल्ह्यात होते. पशुव्यवसायाने खेडय़ापाडय़ांतील सामान्यांच्या जगण्याला दुधासारखीच श्वेत पौष्टिकता मिळवून दिली आहे. गोकुळ, वारणासह अन्य खासगी दूध संघामध्ये दररोज २२ ते २५ लाख लिटर दूध संकलन होते. ही आकडेवारीच या कृषीपूरक उद्योगातील भरारी सांगते. दुधाला मिळणारा समाधानकारक आणि नियमित दर; आधुनिकतेचा अवलंब ही या पूरक व्यवसायाच्या बेरजेच्या बाजू आहेत. त्याधारे गावगाडय़ातील दैन्यावस्था दूर होऊन समृद्धीचे सुखचित्र दारोदारी रेखाटले गेले आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात उसासोबतच केळी, द्राक्षांच्या बागा आणि भाजीपाल्यांची शेती बहरली आहे. येथील हरितगृहातील फुलांना परदेशात मागणी वाढत आहे.
ढासळलेला जमीन दर्जा उंचावण्याचे आव्हान
कोल्हापूरच्या अर्थविकासाला हातभार लावणारा मुख्य व्यवसाय म्हणून पर्यटनाची ओळख दृढ बनत चालली आहे. महालक्ष्मी, जोतिबा या धार्मिक स्थळांसह ऐतिहासिक गडकोट, अभयारण्य, धबधबे, कृषी अशा पर्यटनाची विशाल श्रुंखला विकसित करण्याची मोठी संधी दरवाजा ठोठावत आहे. अशा वेळी पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम करण्याची आत्यंतिक गरज आहे. पर्यटनाच्या वाटा आर्थिक विकासाचा मार्ग सुकर, सुगम करणाऱ्या ठरतील. तद्वत पाणी – खताचा बेसुमार वापर झाल्याने जिल्ह्यातील २० हजारांवर एकर जमीन क्षारपड झाली आहे. ती पुन्हा सुपीक बनवण्याचा उपक्रम शिरोळ तालुक्यात (दत्त साखर कारखान्याच्या पुढाकाराने) सुरू झाला आहे. त्याला बळ दिल्यास कृषी हिरवाईतून संपन्नतेची कृष्णा अव्याहतपणे वाहू लागेल.
संपन्न करणारा मार्ग
कोल्हापूर हे कोकण, गोवा, कर्नाटक, दक्षिण भारत यांना जोडणारे राज्याच्या दक्षिण भागाचे शेवटचे टोक आहे. साहजिकच येथे दळणवळणाची साधनसुविधा आधीपासून चांगली आहे. आता तिने त्यातही कात टाकली आहे. प्रवासाच्या सर्व वाटा गतीने विकसित होत आहेत. पुणे- बंगळूरु महामार्गाचे विस्तारीकरण होत आहे. रत्नागिरी हैदराबाद महामार्गाचे काम झपाटय़ाने केले जात आहे. रेल्वेच्या सुविधांत भर पडत आहे. कोल्हापूर विमानतळावर रात्रीच्या उड्डाणाची सोय झाली आहे. देशातील प्रमुख शहरांना हवाईमार्गे जोडणाऱ्या या विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ प्रगतीची दिशा सांगत आहे.
मुख्य प्रायोजक: सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पॉवर्ड बाय: सिडको ’यूपीएल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.)
नॉलेज पार्टनर गोखले इन्स्टिटय़ूट, पुणे</strong>