कोल्हापुरसह सांगली, सातारा, जिल्ह्यात अपहरण, मारहाण, खासगी सावकारी असे अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या खासगी सावकार सुरज साखरे याच्या ‘एसएस गँग’वर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. सूरज साखरेसह त्याच्या सहा साथीदारांच्या विरोधात विशेष मोक्का न्यायालय पुणे येथे सोमवारी दोषारोपपत्र दाखल झाले. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी अप्पर पोलीस महासंचालकांची मान्यता घेतली आहे.

सूरज हणमंतराव साखरे (वय २८, रा.देवकर पाणंद, कोल्हापूर), त्याचे साथीदार ऋषभ सुनील भालकर (२१, रा. कळंबा रोड), पुष्कराज मुकुंद यादव (२०, रा. शिंगणापूर, ता. करवीर), अभि उर्फ युवराज मोहन महाडिक (मंगळवार पेठ), युनुस हसन मुजावर (रा. राजारामपुरी), चालक संशयित धीरज आण्णा नेजकर (२७, रा. दौलतनगर, मूळ रा. चंदननगर-कोडोली, जि. सातारा) आणि पार्थ अशी त्यांची नावे आहेत.

‘एसएस गँग’ तयार करून या टोळीने बेकायदेशीर खासगी सावकारीच्या माध्यमातून मोठ्या रकमेचे व्याज आकारून अनेकांना कंगाल केले. शहरासह जिल्ह्यातील अनेक मालमत्ता गिळंकृत केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. किरवे (ता. गगनबावडा) येथील रणजित बाबूराव पाटील या तरुणाचे खासगी सावकारीतून अपहरण करून, त्याला डांबून ठेवून, मारहाण करीत २५ लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी सावकार सूरज साखरेसह त्याच्या साथीदारांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच धीरज साखळकर या बांधकाम व्यावसायिकाच्या अपार्टमेंटमधील सहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्या आहेत. पोलिसांनी साखरेच्या घरावर छापे टाकून सावकारकीतून मिळविलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या खरेदी दस्ताच्या फाईली, बँक पासबुक जप्त केले आहेत. या टोळीवर १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.