Explore the majestic Kolhapur Forts and their historical significance in Maharashtra’s heritage : कोल्हापूर जिल्ह्याला जसा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहेस तसाच ऐतिहासिकही वारसा लाभला आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला कोल्हापूर जिल्हा आपल्या शौर्यासाठी आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांसाठी ओळखला जातो. ज्योतिबा अन् महालक्ष्मी मंदिरांसाठी कोल्हापूर ज्याप्रमाणे ओळखला जातो तसाच, येथील ऐतिहासिक गड-किल्ल्यांसाठी पर्यटक कोल्हापुरात येत असतात. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक महत्त्वाचे डोंगरी आणि वनदुर्ग आहेत. पन्हाळा, विशाळगड, पारगड आणि सामानगड हे प्रमुख किल्ले असून, येथील अभेद्य तटबंदी आणि ऐतिहासिक घटना पर्यटकांना आकर्षित करतात. कोल्हापुरातील काही महत्त्वाचे गड-किल्ले पाहुयात, जिथे एकदा जाऊन यायलाच हवे.

पन्हाळगड

कोल्हापूरपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेला हा जिल्हातील सर्वात प्रसिद्ध किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटका करून घेऊन विशाळगडाकडे प्रयाण केले होते, ती ऐतिहासिक घटना याच गडाशी संबंधित आहे. येथे बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा, अंबरखाना आणि सज्जा कोठी ही मुख्य आकर्षणे आहेत.

पावनगड

पन्हाळ्याच्या जवळच असलेला एक छोटा पण महत्त्वाचा किल्ला.

विशाळगड

याला ‘खेळणा’ असेही म्हणतात. हा किल्ला कोल्हापूरपासून सुमारे ७६ किमी अंतरावर असून पावनखिंडीच्या लढाईमुळे प्रसिद्ध आहे. गडावर मलिक रेहान बाबांचा दर्गा आणि विशाळगडाचा भव्य परिसर पाहण्यासारखा आहे.

सामानगड

गडहिंग्लज शहराजवळ असलेला हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला होता. येथे खडकात कोरलेली सात कमानीची विहीर (सात कमान बाव) हे स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. १८४४ मध्ये या गडाने इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले होते.

भुदरगड

गारगोटीपासून १२ किमी अंतरावर असलेल्या या गडावर श्री भैरवनाथाचे प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. येथील ‘दूधसागर तलाव’ पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर दिसतो.

गगनगड

हा किल्ला कोल्हापूरपासून ५५ किमी पश्चिमेला गगनबावडा घाटात स्थित आहे. सध्या हा किल्ला श्री गगनगिरी महाराजांच्या मठासाठी आणि तेथील शांत निसर्गासाठी ओळखला जातो.

रांगणा

हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात दुर्गम आणि ‘रांगडा’ किल्ला मानला जातो. याचे जंगल आणि तटबंदी आजही अभेद्य अवस्थेत आहे.

पारगड

चंदगड तालुक्यात स्थित, शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला त्यांच्या दुर्ग बांधणी कलेचा उत्तम नमुना आहे.