Jeevan Mithari Kolhapur ZP School Teacher: भारतातील ग्रामीण भागात शालेय शिक्षणाची बिकट अवस्था आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत. काही ठिकाणी विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत. शौचालय, वीज, पाणी, चांगल्या इमारती यांची काही ठिकाणी वानवा आहे. तर काही ठिकाणी शिक्षक आहेत, मात्र विद्यार्थीसंख्या तुटपुंजी आहे. कोल्हापूरमधील गगनबावडा तालुक्यातील अशीच एक आगळीवेगळी शाळा आहे. जिथे केवळ एक विद्यार्थी असून त्याला शिकवण्यासाठी ५५ वर्षीय शिक्षक रोज घनदाट जंगलातून पाच किमींची पायपीट करतात.

सरकारी शाळेचा शिक्षक म्हटला तर तो स्वतःच्या वाहनाने किंवा सार्वजनिक वाहतुकीने आपल्या शाळेत जात असेल असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र गगनबावड्यातील कावळटेक धनगरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या जीवन मिथारी यांची कहाणी वेगळीच आहे. शाळेतील केवळ एका विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी मिथारी पाऊस, वारा, ऊन हे सर्व झेलत घनदाट जंगलामधून जंगली प्राण्यांच्या हल्ल्याची जोखीम पत्करुन रोज ५ किमींची पायपीट करतात.

१३ वर्षांपासून ५५ वर्षीय शिक्षक जीवन मिथारी कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या गगनबावड्यातील कावळटेक या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकवत आहेत. या वस्तीमधील शाळेत वीज, वाहनेही पोहचू शकलेले नाही. सर्वात जवळच्या रस्त्यांपासून शाळा अडीच किमी अंतरावर आहे. शाळेत जाण्यासाठी मिथारी यांना रोज किमान ५ किमी चालत जावे लागते.

द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. जीवन मिथारी म्हणाले, “मी २६ जुलै २०१३ रोजी या शाळेत रुजू झालो. तेव्हापासून इथेच शिकवत आहे.” दुर्गम भागात बदली मागण्याचा त्यांचा निर्णय हा धाडसी म्हणावा असा आहे.

स्वतःहून दुर्गम भागातील बदली घेतली

या शाळेत शिक्षक म्हणून येण्यापूर्वी जीवन मिथारी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. या गावात येण्याची आठवण सांगताना मिथारी म्हणाले, एकदा त्यांच्या सहकारी शिक्षकाने म्हटले की, त्यांच्यासारखे प्रभावशाली लोक चांगल्या वशिल्याच्या ठिकाणी नेमणूक मिळवतात. इतरांना मात्र अडगळीत, दुर्गम भागात काम करावे लागते.

सहकाऱ्याच्या या टिप्पणीनंतर जीवन मिथारी यांनी म्हटले की, मी अशा ठिकाणी जाऊन काम करायला तयार आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः बदलीसाठी अर्ज करून दुर्गम भागातील शाळेची निवड केली.

शाळेत एकच विद्यार्थी का?

शाळेबद्दल सांगताना जीवन मिथारी म्हणाले, एके काळी शाळेत विद्यार्थ्यांची बरीच संख्या होती. कावळटेक आणि आनंदूर धनगरवाडा या वस्त्यांत पूर्वी ७० ते १०० कुटुंबे राहत होती. मात्र २००० सालानंतर कोल्हापूर शहरात रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्यामुळे वस्ती हळूहळू विरळ झाली. ज्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही आपसूक कमी झाली.

यावर्षी शाळेत अधिकृतपणे केवळ एकाच विद्यार्थिनीने प्रवेश घेतलेला आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी स्वरा बोडके ही एकमेव विद्यार्थिनी शाळेत आहे. तिची धाकटी बहीण लहान असून गावात अंगणवाडी आणि बाल संगोपन केंद्र नसल्यामुळे तिच्याबरोबर शाळेत येते. ती पुढल्या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश घेईल, अशी अपेक्षा आहे.

जंगलात वन्य प्राण्यांचा धोका

शाळेत केवळ एक विद्यार्थिनी असली तरी जीवन मिथारी यांच्या समर्पण वृत्तीत तसूभरही फरक पडलेला नाही. पटसंख्या कमी असली तरी मला माझे कर्तव्य बजावावेच लागेल, असे मिथारी सांगतात. जंगलातील प्रवासाची माहिती देताना ते म्हणाले, “शाळेपर्यंत येण्याचा मार्ग जोखमीचा आहे. जंगलात गवा, बिबटे आणि इतर वन्यजीवांचा मुक्त वावर आहे. प्राणी अचानक समोर आल्यास काय करावे, याचे शिक्षण गावकऱ्यांनी दिले आहे.” आपण प्राण्यांच्या हद्दीत आहोत, असेही ते सांगतात.

एकेदिवशी बिबट्याने वस्तीतील एका लहान बैलाला ठार केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी ट्रॅप कॅमेरा बसवून संबंधित बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली. शाळेच्या वाटेतून जात असताना कुठेही न थांबण्याचा सल्ला त्यांनी मला दिला, अशीही आठवण मिथारी यांनी सांगितली.

मीही एक माणूस आहे. मला भीती वाटते. पण १३ वर्षांत याची सवय झाली आहे, असेही मिथारी मोकळेपणाने सांगतात. मिथारी मे २०२९ मध्ये निवृत्त होणार आहेत. ही रोजची पायपीट आता व्यायामाचा एक प्रकार झाला आहे, असे सांगून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेभोवती संरक्षक भिंत आवश्यक असल्याची मागणी केली.