कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

तातडीने जिल्हाधिकारी सोबत बैठकीचे आयोजन करा अन्यथा गाव चावडीचे कामकाज, पंचनामे बंद पाडण्याचा इशारा

शिरोळ येथील शिवाजी तख्त पासून पूरग्रस्तांच्या मोर्चास सुरूवात झाली होती.
कोल्हापुरमधील शिरोळ तालुका पूरग्रस्त जाहीर करून नियम अटी न लावता १०० टक्के नुकसांन भरपाई द्यावी या मागणीकरिता शिरोळ तालुका पूरग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन शिरोळ तहसीलदार कार्यालयावर करण्यात आले होते. याप्रश्नी तातडीने जिल्हाधिकारी सोबत बैठकीचे आयोजन करा, अन्यथा बुधवार पासून शिरोळ तालुक्यातील गाव चावडीचे कामकाज, पंचनामे बंद पाडू, असा इशारा देण्यात आला.

शिरोळ तालुक्याला कायम स्वरूपी पुराचा धोका होऊ नये या करिता ठोस उपाययोजना कराव्यात, ४२ हुन अधिक गावांना पुराच्या पाण्याने मालमत्ता व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, सानुग्रह अनुदान त्वरित द्यावे अशा मागण्यासाठी आज दुपारी शिरोळ येथील शिवाजी तख्त पासून पूरग्रस्तांच्या मोर्चास सुरूवात झाली. तहसील कार्यालायसमोर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.

राजवर्धन नाईक निंबाळकर, पृथ्वीराज यादव, दिगंबर सकट, सचिन शिंदे, रामदास मदाळे, विलास कांबळे, विजय भोजे, धनंजय चूडमंगे, सदाशिव आंबी आदींनी मनोगतातून पूरग्रस्तांच्या अडचणी प्रशासना समोर मांडल्या. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकर तारीख व वेळ कळविण्यात येइल, असे सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kolhapur in shirol taluka flood victims protest at tehsil office msr