नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर भाविकांना खुले झाले. करोना नियमाचे पालन करीत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विजयादशमी पर्यंत ही गर्दी अशीच राहण्याची चिन्हे आहेत. घटस्थापनेपासून मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महालक्ष्मी व दखनचा राजा जोतिबा यासह तीन हजाराहून अधिक मंदिरे उघडण्याच्या निर्णय घेतला होता.
आज पहाटे पाच वाजता महालक्ष्मीचे मंदिर उघडण्यात आले. ‘अंबा माता की जय’ असा गजर करीत भाविकांनी मंदिरात प्रवेश केला. प्रथम काकड आरती झाली.नंतर अभिषेक करण्यात आला. मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ई -पास असलेल्या भाविकांना दर्शनासाठी मुभा होती. भाविकांनी ऑनलाईन नोंदणी मोठ्या प्रमाणात केली आहे. पुढील तीन दिवसाचे नोंदणी आत्ताच पूर्ण झाली आहे. मंदिराच्या पूर्व बाजूकडून भाविकांना प्रवेश दिला जात आहे.
यावेळी मंदिरात फुलांची विशेष सजावट करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे. यामुळे मंदिराच्या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. भाविकांनी करोना नियमाचे पालन करीत दर्शन करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी केले आहे. ई-पास नसलेले अन्य भाविक महाद्वार रस्त्याकडील बाजूने मुखदर्शन घेत आहेत. पहिल्या दिवशी भाविकांनी शिस्तीचे पालन केले. मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
