…अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात

“हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर..”

नवी दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन होत असताना पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कॉलरला पोलिसांनी हात घातला. त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते संतापले. त्यातून पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी शेट्टी यांनी केंद्र शासनावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधानांबरोबरच शेट्टी यांनी गृहमंत्र्यांवरही टीका केली.

नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळालं. आंदोलनाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा आणण्यात आला होता. मात्र हा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे काही अवशेष गोळा केले आणि ते पेटवून दिले. यातून पोलिस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. या गोंधळात पोलिसांनी शेट्टी यांच्या कॉलरला हात घातला. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच खवळले. या प्रकाराचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या झालेल्या प्रकारामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

शेट्टी यांची केंद्र सरकारवर टीका…

या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे धोरणाविरुद्ध घेत असलेल्या भूमिकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. “शेतकऱ्यांना खलीस्थानवादी ठरवणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटून उठेल,” अशा शब्दांमध्ये शेट्टी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

हे आंदोलन केवळ पंजाब आणि उत्तर भारतापुरते नाही…

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही विधेयके मागे घेण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जात आणि प्रांतवाद देण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण देश केंद्राच्या विरोधात पेटवून सोडल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असंही शेट्टी यावेळी म्हणाले. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी निगडित आहे. शेतकरी न्याय मागत असताना शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे अन्यायकारक आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kolhapur police and raju shetti supporters fights during protest scsg

ताज्या बातम्या