कोल्हापूर- रत्नागिरी रस्त्यावर वाघबीळ नजीक एसटी महामंडळाच्या धावत्या मिनी बसने (क्र. एम.एच १२- झेड.एच. ७८५१) शनिवारी दुपारी पेट घेतला. या आगीत पूर्ण बस जाळून खाक झाली आहे. या मिनी बसमधील ४४ प्रवासी बचावले आहेत. महापालिका व वारणा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.
एसटीची मिनी बस ४४ कोल्हापूरहून  प्रवाशी घेऊन पन्हाळ्याला निघाली होती. दुपारी १२ वा.च्या सुमारास वाघबीळ जवळ या बसच्या अचानक धूर आला. एस.टी.च्या रेडीएटरमधील पाणी उकळून ते बॅटरीवर सांडले. त्यामुळे तप्त झालेली बॅटरी पेटली गेली. ते पाहून बसचालक नंदकुमार बाबुराव ओतारी यांनी बसमधून उडी मारली. ओतारी याने प्रसंगावधान राखून सर्व विद्यार्थी, प्रवाशांना खाली उतरवल्याने कोणीही जखमी झाले नाही. आगीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तासाहून अधिककाळ बंद राहिला. वाहतुकीची प्रंचड कोंडी झाली होती. तर तालुक्याचे ठिकाण असलेल्या पन्हाळा येथे शासकीय न्यायालयीन कामकाजासाठी जाणाऱ्र्या प्रवाशांना पायपीट करावी लागली. कोडोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.