घटस्थापनेच्या दिवशी सदाभाऊंकडून नव्या संघटनेची घोषणा

प्रदेशाध्यक्षपदी हायटेक टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, maharashtra, maharashtra news, maharashtra news in marathi, maharashtra politics, politics, kolhapur, sadabhau khot, new political party, rayat kranti sanghatana, show, strenght, raju shetty
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर नव्या संघटनेची घोषणा केली. ‘रयत क्रांती संघटना’ असे खोत यांच्या संघटनेचे नाव असून प्रत्येक तालुक्यात पाच हजार याप्रमाणे महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यात १७ लाख सदस्य करून माझ्या संघटनेची ताकद दाखवून देईन अशी गर्जनाही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद झाले. मंत्रिपदावर असतानाही शेतकऱ्यांच्या हिताची तसेच संघटनेशी सुसंगत भूमिका न घेणे असा ठपका ठेपत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची ऑगस्टमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून खोत हे नवीन संघटना काढणार अशी चर्चा होती. खुद्द खोत यांनीदेखील तसे संकेत दिले होते.

गुरुवारी कोल्हापूरमध्ये सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ या नवीन संघटनेची घोषणा केली. शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या सोहळ्यात खोत यांनी शक्तिप्रदर्शन केले. मला कोणाचा पाठिंबा नसेल अशी वल्गना करणाऱ्यांना गेल्या ३२ वर्षात शेतकरी चळवळीतून मी माणसं जमवली हेच दाखवून देईन, असे खोत यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा यासाठी ही संघटना काम करत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. कर्जमुक्तीच्या प्रश्नातील अडचणींकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमुक्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २२ सप्टेंबरला संपणार असली तरी आणखी १५ दिवसांनी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीविषयी खोत म्हणाले, लोकसभा निवडणुकीला अद्याप २ वर्षांचा कालावधी आहे. त्यावर आत्ताच बोलण्याची गरज नाही. गहू तेव्हा पोळ्या; त्यावर आत्ताच कशाला बोलायला पाहिजे. तोपर्यंत आपण चांगले बियाणे पेरून शेतीची चांगली मशागत केली पाहिजे. त्याची धान्याची रास अशी झाली पाहिजे की दिल्लीच्या तख्ताला ती कळली पाहिजे असे खोत यांनी नमूद केले.

सुरेश पाटील प्रदेशाध्यक्ष
‘संवादातून संघर्षाकडे’ असे खोत यांच्या संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी हायटेक टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची तर युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधव यांची निवड करण्यात आली.

सदाभाऊंना आली भोवळ
घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात संघटनेच्या स्थापनेसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती काही काळ अचानक बिघडली. त्यांना विश्रामधामवर भोवळ आली. थकव्यामुळे त्यांना ही चक्कर आली होती, पण काही वेळातच ते सावरले. त्यानंतर त्यांनी आवेशात भाषण करून सभेत चैतन्य आणले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kolhapur sadabhau khot forms new political party rayat kranti sanghatana will show my strenght to raju shetty