रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत कोल्हापूरहून सहलीस आलेल्या एका विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राला स्थानिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) याला सुखरूप वाचविण्यात आले आहे. मयूरवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील एका खासगी शिकवणी वर्गातील ४१ विद्यार्थ्यांचा समूह शिक्षकांसह सहलीसाठी आरेवारे समुद्रकिनारी आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी अतुल सुतार हा पोहत समुद्राच्या आतल्या बाजूस गेला. त्याला परत बोलविण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडेही त्याच्या मागोमाग गेला. मात्र समुद्रातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले.

दोघे विद्यार्थी अडचणीत सापडल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील तसेच झीप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी तत्काळ समुद्रात धाव घेत दोघांनाही बाहेर काढले.

मात्र अतुल सुतार याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मयूर खाडे याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते रत्नागिरीकडे रवाना झाले होते. या दुर्घटनेमुळे सहलीस आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.