कागल तालुक्यातील सुळकुड या गावाची आता महापुराच्या संकटातून सुटका होणार आहे. पावसाळ्यात सुळकुडला अंदमान निकोबार बेटासारखे स्वरूप यायचे. सर्व बाजुंनी या गावाचा संपर्क तुटायचा. आता या गावातील दूधगंगा नदीवर नवीन पुल उभारण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला.

पुलाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने आदीच्या उपस्थितीत झाला. या सर्वांनी मोटारीतून पुलावरून पहिला प्रवास करून लोकार्पण केले. सांगाव सुळकूड गावांना जोडणारा हा १२० मीटर लांबीचा व २५ फूट रुंदीचा पूल सहा कोटी रूपये निधी खर्चून बांधला आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पावसाळ्यात सुळकुडला अंदमान निकोबार बेटासारखे स्वरूप यायचे. गेल्या वर्षी तर या गावाने ‘आम्हाला कर्नाटकात घाला’, अशी संतप्त मागणी केली होती. या पुलामुळे गाव महाराष्ट्राशी बारमाही संपर्कात राहील.