Shivaji Kon Hota book controversy update : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बुलढाण्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामुळे या पुस्तकाच्या वाचनाचे कार्यक्रम चर्चेत आले आहेत. आमदार गायकवाडांनी पुस्तकावर बंदीची मागणी करत प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप आहे, याच्या निषेधार्थ आज प्रकाशक प्रशांत आंबी यांनी संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. तसंच, त्यांच्या घरात जाऊन या पुस्तकाचे वाचन करणार असून या पुस्तकात जसा उल्लेख आहे त्या पद्धतीनेच उल्लेख करणार असल्याचं प्रशांत आंबी यांनी म्हटलं आहे. यावर आमदार संजय गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन आरती कार्यक्रम प्रशासनाने रद्द केला होता. आम्ही कायद्याचा सन्मान करून आमचा कार्यक्रम रद्द केला. तसाच त्यांचाही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता जाणुनबुजून २० लाख पुस्तकांच्या प्रती छापल्या आणि त्या विकल्या. मग त्या पुस्तकाचं वाचन करायची गरज काय? त्यांच्या पुस्तक वाचनात आम्ही सहभागी होणार असून आम्ही अत्यंत विनयशीलतेने पुस्तक वाचणार आहोत. पुस्तक वाचनादरम्यान, महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला, तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार. परंतु एकेरी भाषेत उल्लेख केला आणि शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर त्याची जबाबदारी आयोजकांची किंवा पुस्तक वाचणाऱ्याची राहील”, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला.
मी तशी मागणी केली नाही
दरम्यान, पानसरेंविरुद्ध ‘मरणोत्तर गुन्हा’ दाखल करा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली असल्याचा दावा करण्यात येतोय, त्यावर संजय गायकवाड म्हणाले, “अशी कोणतीही मागणी आम्ही केली नाही. तसंच, प्रशांत आंबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील शिवभक्तांचा अपमान झाला आहे. त्यांच्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही संजय गायकवाड म्हणाले.
