रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर केला. यंदा दोन्ही इयत्तांच्या निकालात मोठी घसरण झाल्याचे चित्र समोर आले असून, दहावीचा निकाल केवळ १२.२६ टक्के, तर बारावीचा निकाल २०.९० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात १५.३९ टक्के आणि बारावीच्या निकालात ११.१५ टक्क्यांची लक्षणीय घसरण झाली आहे.

निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत १९९ मुलांपैकी केवळ १८ (९.०४%) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ७० मुलींमधील १५ (२१.४२%) विद्यार्थिनींनी यश संपादन केले. बारावीत ४८४ मुलांपैकी ८७ (१७.९७%) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २०० मुलींमधील ५६ (२८.००%) विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन मुलींचे वर्चस्व कायम राहिले.

दहावीच्या जिल्हानिहाय निकालात रत्नागिरी जिल्हा १६.२० टक्क्यांसह आघाडीवर राहिला, तर सिंधुदुर्गचा निकाल केवळ ४.४४ टक्के लागला. मात्र बारावीत चित्र उलट दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने २४.६७ टक्के निकालासह बाजी मारली, तर रत्नागिरीचा निकाल १९.८१ टक्के राहिला.

बारावीच्या शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने सर्वाधिक ३४.०८ टक्के निकालाची नोंद केली. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल १५.६४ टक्के, कला शाखेचा १३.४४ टक्के, व्यावसायिक शाखेचा ८.३३ टक्के, तर टेक्निकल शाखेचा निकाल शून्य टक्के लागला.

यंदाची दहावीची लेखी परीक्षा १६ ते ३० जून, तर बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पार पडली.

परीक्षा केंद्रांवर कॉपीचे एकही प्रकरण आढळले नाही. मात्र परीक्षेनंतरच्या छाननीत दहावीतील ४ आणि बारावीतील १ गैरमार्गाचे प्रकरण निदर्शनास आले. यंदा सर्व ११ परीक्षा केंद्रे आणि वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली.

निकालानंतर गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना १५ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

 पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असून, ती प्राप्त झाल्यानंतर पुढील पाच कार्यालयीन दिवसांत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि प्रभारी विभागीय सचिव प्रेरणा शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुढील परीक्षेची तयारी करावी, असा संदेश दिला.