अलिबाग- राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणातील पर्जन्यमान कितीतरी अधिक असते, मात्र एल निनोच्या प्रभावामुळे कोकणातही यंदा पावसात मोठी तूट दिसून आली आहे. त्यामुळे पाणीदार कोकणावरही यंदा दुष्काळाची छाया पसरू लागली आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी सह रायगड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. त्यामुळे भात शेती संकटात सापडली आहे. प्रथमच कोकणातील ११ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जुन ते सप्टेंबर मधील सरासरी पर्जन्यमान २ हजार ८९६ आहे. त्यातुलनेत यंदा सरासरी २ हजार १४८ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण ७४ टक्के आहे. म्हणजेच जवळपास २६ टक्के पावसाची तूट दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत ३ हजार १४२ मिलीमिटर पाऊस पडतो. त्यातुलनेत यंदा २ हजार ६८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या ८५ टक्के पाऊस इथे नोंदविला गेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. इथे सरासरी पर्जन्यमानाच्या ९१ टक्के पाऊस पडला आहे. मात्र श्रीवर्धन आणि म्हसळा या दोन तालुक्यात पर्जन्यमान २० टक्क्यांनी घटले आहे.

महत्वाची बाब म्हणजे जुलै महिन्याचा अपवाद सोडला तर तिनही जिल्ह्यात जुन, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाची प्रमाण ५० टक्क्यांहून कमी आहे. भात पिक तयार होण्याच्या स्थितीत असतांनाच पावसाने ओढ दिल्याने, भातशेती संकटात सापडली आहे. कोकणात खरीप हंगामात प्रामुख्याने भात आणि नाचणी या प्रामुख्याने दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण आधी पावसाने दिलेली ओढ आणि आता तपमानात झालेली अचनाक वाढ यामुळे भात आणि नाचणी पिकांवर परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिकांची पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनियमित पावासामुळे आणि हवामानातील बदलामुळे दोन्ही पिकांवर परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण लक्षणीय घटल्याने पिकांचे संगोपन आणि संवर्धन करणे आव्हानात्मक बनले आहे. हीच परिस्थिती कायम राहील्यास हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट होण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आणि जरी पिक वाचले तरी त्याची उत्पादकता घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे पाणीदार कोकणातील शेतीवरही यंदा दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदा राज्यसरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८, रत्नागिरीतील ३ तर रायगड मधील १ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाला दुष्काळी तालुक्यातील पिक परिस्थितीचे आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोकणातील दुष्काळी तालुके कोणते?

सिंधुदुर्ग- सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.

रत्नागिरी- रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर

रायगड – श्रीवर्धन

पिक परिस्थिती सध्या कशी?

सध्या हळवे, निमगरवे आणि गरवे भात दाणे भरण्याच्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत आहेत. याच काळात शेतात आवश्यक पाणी नसल्याने उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास भात उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.