मुंबई : कोकणातील कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक १.३४ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारने २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.

ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रामुख्याने आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे. कोकण विभागातील एकूण १ लाख ३४ हजार २५१ शेतकरी या मदतीस पात्र ठरले आहेत. बाधित क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ९२ हजार ३४२.७८ हेक्टर आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला सर्वाधिक मदत

कोकणातील आंबा, काजू आणि इतर फळपिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ हजार ६२८ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ९८.४४ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना ७९.०६ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार मदत

शासनाने ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. एका हंगामात एकदाच मदत देण्याचा नियम असल्याने यापूर्वी दिलेल्या मदतीचा आणि नव्या प्रस्तावातील निधीचा दुबार समावेश होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत बँकांनी कर्ज खात्यात किंवा इतर कोणत्याही वसुलीसाठी वळती करू नये. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना देण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.

२४ तासांत मदत वितरणाचे आदेश

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. पंचनाम्याचा अहवाल बुधवारी सरकारला मिळाला, गुरुवारी तत्काळ मदत वितरणाचे आदेश दिले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मदतीचे वितरण थेट बँक खात्यांवर होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.