मुंबई : हवामान बदलाचा परिणाम म्हणून कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला हापूसचा तुटवडा भासणार आहे. कोकण हापूसचा दर आकारानुसार दोन ते साडेतीन हजार रुपये प्रति डझनावर जाईल, असा अंदाज वाशी बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली आहे.

यंदा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबला. कोकण किनारपट्टीवर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वादळी पाऊस झाला. त्यामुळे हवेत आद्रर्ता वाढली. पावसामुळे पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर गळून गेला. बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आंबा उत्पादनात सत्तर टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. पूर्व हंगामी आणि पहिल्या टप्प्यातील मोहरापासून तयार झालेला हापूस आंबा कमी आहे.

दरवर्षी गुढी पाडव्याच्या अगोदर आठ दिवस वाशी बाजार समितीत कोकणातून दररोज तीस ते पस्तीस हजार पेट्यांची आवक होत होती. यंदा पाडव्या दिवशी जेमतेम दहा हजार पेट्यांची आवक होण्याचा अंदाज आहे. आजपर्यंत झालेली आवकही अत्यंत कमी आहे. त्यामुळे मुंबईत गुढी पाडव्याला हापूस फारसा उपलब्ध नसेल. कोकण हापूसचा दरही आकारानुसार दोन ते साडेतीन हजार रुपये प्रती डझन राहील.

केरळ, कर्नाटकमधूनही कमी आवक

वाशी बाजारात केरळ, कर्नाटकमधूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे. पण, ती आवकही दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. केरळ, कर्नाटकमधून आलेल्या आंब्याला सरासरी पंधराशे रुपये दर मिळत आहे, अशी माहिती पानसरे यांनी दिली.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हापूस बाजारात

मुंबई, पुण्यात पाडव्यानिमित्त स्टॉलवर काही प्रमाणात हापूस ठेवला जायचा. यंदा अत्यंत कमी प्रमाणात आंबा आहे. तयार हापूसचा दर सरासरी २,६०० ते ३,२०० रुपये प्रति डझन आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला नक्कीच हापूसचा तुटवडा आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हापूस काही प्रमाणात बाजारात येईल, अशी माहिती देवगड येथील आंबा बागायतदार चैतन्य पाटणकर यांनी दिली.