रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये सुरू असलेल्या नियमित तपासणीदरम्यान ‘कोकण कन्या एक्सप्रेस’ (गाडी क्र. ११००४) मध्ये अवैध मद्यसाठा आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एसी कोच अटेंडंटचाच सहभाग समोर आल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि सी अँड आय विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू असताना संशयावरून संबंधित अटेंडंटची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्याकडून बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या तब्बल ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

रेल्वे कर्मचाऱ्याचाच अशा प्रकारच्या गैरप्रकारात सहभाग आढळल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वे प्रवास सुरळीत पार पडावा यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, प्रवाशांनी प्रतिबंधित वस्तू सोबत बाळगू नयेत तसेच संशयास्पद हालचालींबाबत तत्काळ रेल्वे प्रशासनाला कळवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. संबंधित अटेंडंटविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.