अलिबाग- राज्यातील इतर भागांच्या तुलनेक कोकणात मोठ्या प्रमाणात किंग कोब्रा आढळून येतात. हे नाग राज्यात इतर ठिकाणी आढळणाऱ्या नागांपेक्षा आकाराने मोठे असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि दोडा मार्ग परिसरात आठवड्याभरात किंग कोब्रा अर्थात नागराज आढळून येण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. काय आहेत या मागची कारणे याचा थोडक्यात आढावा….

झाले काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील मॅथ्यु शॉबिन यांच्या रबर प्लांटेशनमध्ये नुकताच एक अजस्त्र नाग आढळून आला. माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने या अजस्त्र नागाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले, जवळपास १५ फूट लांबीचा ‘किंग कोब्रा’ अर्थात नागराज असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील तळकट परिसरात असाच भला मोठा नाग आढळला होता, त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. आठवड्या भरात राजनाग दिसण्याच्या दोन घटना समोर आल्या. त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण असले तरी, सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांनी या घटनेबाबत कुतूहल व्यक्त केले आहे

राज नागाचे महत्व काय?

किंग्र क्रोबा अर्थात नागराज हा भूतलावर आढळून येणारा सर्वात मोठा विषारी साप म्हणून ओळखला जातो. ज्याची लांबी १२ फूट ते १६ फुटांपर्यंत असते, काही ठिकाणी ती १९ फुटांपर्यंतही आढळून आली आहे. स्वजात भक्षक साप म्हणूनही हा नाग ओळखला जातो. विषारी आणि बिनविषारी असे दोन्ही प्रकारचे साप खातो. या सापाचे आणखिन एक वेगळेपण म्हणजे राज नागाची मादी स्वतःचे घरटे तयार करून अंडी देते. पाला पाचोळा गर्द हिरव्या जंगलामध्ये या नागांचे वास्तव्य असते.

महाराष्ट्रात या सापाचा अधिवास कुठे?

महाराष्ट्रात प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातच नागराज आढळून योतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी तर कोल्हापूर मधील चंदगड तालुक्यांमध्ये या नागराजांचा अधिवास आढळतो, महाराष्ट्राबाहेक पश्चिम घाटातील प्रदेशात हा नागराज वास्तव्य करत असल्याचे दिसून येतो. या नागराजाला ऑफीओ फॅगस कलिंगा असेही त्याला संबोधले जाते. भारतात पाच नागाच्या प्रजाती आढळून येतात,यातील किंग कोब्रा हा आकाराने सर्वात मोठा साप आहे.

सिंधुदुर्गात अचानक नागराज दिसण्याचे प्रमाण का वाढले?

फेब्रुवारी ते मार्च हा या सापांचा मिलनाचा काळ असतो, त्यामुळे जोडीदाराच्या शोधात नागराज या कालावधीत बाहेर पडतात. आसपासच्या परिसरात शिरतात. एरवी शांत असलेले हे साप मिलनाच्या काळात जास्त आक्रमक असल्याचे वन्यजीव अभ्यासकांकडून सांगितले जात. त्यामुळे अशा नागराजांची काळजीपूर्वक हातळणी करणे गरजेचे असते, त्यांना सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे आवश्यक असते.