सावंतवाडी: कोकणच्या शिमगोत्सवातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील ऐतिहासिक आणि चित्तथरारक ‘हुडोत्सव’ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. १०० फूट उंच हुड्यावर चढलेल्या संचाराच्या (अवसार) दिशेने भाविकांनी दगडांचा वर्षाव केला. हा अंगावर शहारे आणणारा सोहळा अनुभवण्यासाठी सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा आणि कर्नाटक राज्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

​भावा-बहिणींची भेट आणि पालखी सोहळा:

​शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी कुणकेरीमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या सुरुवातीला आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल आणि कोलगावचा श्री देव कलेश्वर यांनी आपली बहीण श्री देवी भावईची भेट घेतली. तिन्ही गावांच्या सीमेवर हा भावूक भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर तिन्ही गावांची निशाणे हुड्याच्या ठिकाणी दाखल झाली. त्यानंतर देवीचे अवसार गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढले.

​चित्तथरारक दगडफेक परंपरा:

​सायंकाळच्या वेळी जेव्हा भावई देवस्थानचे अवसार(संचार )हुड्यावर चढले, तेव्हा उपस्थित हजारो भाविकांनी त्यांच्या दिशेने दगड मारले. या संचारावर ज्याचा दगड बसतो, तो भाविक स्वतःला भाग्यवान समजतो, अशी येथे श्रद्धा आहे. ‘भल्ली-भल्ली भावईच्या’ जयघोषाने संपूर्ण कुणकेरी परिसर दुमदुमून गेला होता. ​या उत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे रोंबाट, वाघ शिकार आणि घोडेमोडणी होय .विशेष म्हणजे, वाघ खेळाची परंपरा जपण्यासाठी कुणकेरकर कुटुंबीय थेट लंडनहून गावात दाखल झाले होते. दरवर्षी हे कुटुंब या उत्सवासाठी नित्यनियमाने उपस्थित राहते. याव्यतिरिक्त पाथर धनगरणीचा दगड उचलण्याचे पारंपरिक खेळही पार पडले. ​सायंकाळी सात वाजेपर्यंत चाललेल्या या उत्सवात महिला वर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती. रात्री उशिरा या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली.