रत्नागिरी: कोकणातील कथित जमीन घोटाळ्यांवर राज्य सरकारने मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले असून, परस्पर जमिनींची विक्री, महसूल नोंदीतील अनियमितता आणि सरकारी ताब्यात जाणे अपेक्षित असलेल्या जमिनींच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
रत्नागिरी येथे पत्रकारांशी औपचारिक संवाद साधताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणांच्या चौकशीसाठी १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती पुढील दोन ते तीन महिन्यांत कोकणात दाखल होऊन विविध प्रकरणांची तपासणी सुरू करणार आहे.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, कोकणात हजारो-लाखो जमीन व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी मालक नसलेल्या जमिनी नियमानुसार सरकारी जमा होणे आवश्यक असताना तसे झाले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी स्तरावरही गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे त्यांनी सांगितले
या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. महसूल विभागातील पारदर्शकता वाढविणे आणि बेकायदेशीर जमीन व्यवहारांना आळा घालणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीन घोटाळ्यांची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत असून, महसूल विभागातील गैरप्रकारांवर मोठा अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
