अलिबाग – शिवसेना आमदारांच्या विरोधानंतरही कोकणातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्याच पारड्यात गेली आहे. अनिकेत तटकरे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून संधी दिली जाणार आहे. अनिकेत तटकरे सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध होता. कोकणात शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असल्याने ही जागा शिवसेनेसाठीच सोडली जावी अशी आग्रही भूमिका या आमदारांची होती. मात्र शिवसेना आमदारांचा विरोध डावलून अनिकेत तटकरे यांनाच संधी देण्याचे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी निश्चित केले. नाराज शिवसेना आमदारांनी रविवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीीबाबत कोकणातील आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. यावेळी महायुतीचा धर्म पाळण्याचा एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिला. त्याच वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत वाटाघाटी सुरू राहणार असल्याचे त्यांनी आमदारांना सांगितले. बैठकीनंतर शिवसेना अजूनही या जागेसाठी आग्रही असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर केले.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारीचा आढावा घेतला. यानंतर अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीला एकाच गाडीतून रवाना झाले. अनिकेत तटकरे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कोकणातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. १०१८ मतदार सदस्य आमदाराचे भवितव्य ठरविणार आहेत. यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि पनवेल महानगर पालिकेतील सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत पंचायत समितीतील १९७ महानगरपालिका, नगरपांलिका आणि नगरपंचायतीमधील ८२१ सदस्यांचा समावेश आहे.

पक्ष निहाय मतांचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे ३०५, भाजपचे २७६ राष्ट्रवादी काँग्रेसचे १२७ काँग्रेसचे ५० तर शिवसेना ठाकरे गटाचे ५५ सदस्य आहेत. सहाजिकच शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी केली जात आहे.