Aniket Tatkare NCP Vs Bal Mane Shiv Sena UBT / रत्नागिरी :  रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारी दोन्ही आघाड्यांच्या अधिकृत उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, भाजपचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतच अंतर्गत संघर्ष उभा राहिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकजूट दाखवत मोठी उपस्थिती लावली. मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीने ही जागा प्रतिष्ठेची मानून निवडणुकीत पूर्ण ताकद लावण्याचे संकेत या शक्तिप्रदर्शनातून दिले.

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, मिहीर माने तसेच माधवी माने यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या संपर्काच्या जोरावर ही जागा जिंकण्याचा निर्धार महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.

मात्र, अधिकृत उमेदवारांच्या अर्जांपेक्षा अपक्ष उमेदवारांच्या एन्ट्रीमुळेच राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. जुईली महेंद्र दळवी, ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि अनिल रमेश चोपडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते जुईली दळवी यांच्या अर्जाने. त्या भाजपचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या असल्याने त्यांच्या अपक्ष उमेदवारीमागे नेमका काय राजकीय हेतू आहे, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, जुईली दळवी यांचा अर्ज हा केवळ तांत्रिक किंवा राजकीय दबावतंत्राचा भाग आहे की महायुतीतील काही नाराजीचे संकेत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत या चर्चांना आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकण विधान परिषद मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष अर्ज छाननी आणि संभाव्य माघारींकडे लागले आहे. अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम राहतात की राजकीय समीकरणांनुसार माघार घेतात, यावरही निवडणुकीचे चित्र काही प्रमाणात अवलंबून राहणार आहे.

कोकण विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगणार असली, तरी जुईली दळवी यांच्या अपक्ष उमेदवारीने या निवडणुकीत उत्सुकता आणि राजकीय गूढता अधिकच वाढवली आहे. आगामी काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे कोकणच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.