सावंतवाडी: हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. अवकाळी पाऊस, दाट धुके आणि पडणाऱ्या दव (खार) मुळे मोहोर काळा पडला असून बागांचे ८५ ते ९० टक्के नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

​आमदार केसरकर यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले असून तसे अहवाल फेब्रुवारी महिन्यातच शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, त्यामुळे शासनाने विशेष नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

​यावर उत्तर देताना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नुकसानीचे वास्तव मान्य केले. आंबा पिकासाठी ६०४ कोटी रुपये (सिंधुदुर्गसाठी २२३ कोटी) आणि काजूसाठी ९४ कोटी रुपये (सिंधुदुर्गसाठी ४९ कोटी) संरक्षित रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रोग नियंत्रणासाठी ‘आंबा टास्क फोर्स’ अंतर्गत ८ गावांची निवड करून तेथे प्रात्यक्षिके राबवली जात असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. शासन बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

​दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी खासदार राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. शासनाने अर्थसंकल्पात सरसकट कर्जमुक्ती आणि हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी १२ मार्च रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ​बागायतदार सध्या आर्थिक अडचणीत असून शासन प्रत्यक्ष मदत कधी जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.