मुंबई : कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मदतीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही या पूर्वीचा अनुभव चांगला नाही. शेतकरी अडीच महिने रस्त्यावरची लढाई लढत आहेत. तरीही सरकारने त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकरी शुक्रवारी, १५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १५ मे रोजी आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची व संघटनांची मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, शिवसेनेचे (ठाकरे)विनायक राऊत, काँग्रेसचे भाई जगताप, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, शेकापचे राजेंद्र कोरडे, मनसेचे प्रवक्ते कुणाल माईनकर , माकपचे अरमाईटी इराणी, राजन राजे आदी उपस्थित होते.

विमा कंपनीच्या जाचक अटी व नियमांमुळे शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई मिळाली नाही. नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारने एनडीआरएफकडे म्हणजेच केंद्र सरकारकडे कोणतीही मदत मागितली नाही, तसा प्रस्तावही सादर केलेला नाही. प्रशासन व राज्य सरकारकडून पंचनाम्याच्याबाबतीत कागदी घोडे नाचवले जात आहेत. राज्य सरकार आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीबाबत वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

कोकणातील शेतकरी आता आत्महत्या करू लागले आहेत. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना संकटात टाकले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने मदतीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.

आंबा, काजू पीक कोकणातील शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. यंदाच्या वर्षी हवामानातील बदल, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पंचनामे करण्याबाबत यंत्रणा अपुरी पडली आहे, अजून ५० टक्केही पंचनामे झाले नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला.