रत्नागिरी : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेरच्या क्षणी झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे अपेक्षित राजकीय लढत टळली. महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेकडे जाण्याचा मार्ग बिनविरोध मोकळा झाला आहे.

अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बाळ माने यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता असताना या निर्णयाने निवडणुकीतील सर्वच समीकरणे बदलली.

कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंख्येच्या गणितात महायुतीचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते. शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित संख्याबळामुळे अनिकेत तटकरे यांची स्थिती भक्कम होती. मात्र, निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या बाळ माने यांच्या माघारीने उरलेल्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी महाविकास आघाडीतील अपुऱ्या समन्वयावर बोट ठेवले. काही मतदार तीर्थयात्रेला गेल्याने तसेच आवश्यक सह्यांसाठी अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मतदारसंघात ‘घोडेबाजार’ सुरू असल्याची माहिती मिळाल्याने कोकणच्या राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचू नये, या भूमिकेतून माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नारायण राणे यांच्या सूचनेवरून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर टाळले. “राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. बार्गेनिंग केले असते तर खूप काही कमावले असते,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

बाळ माने यांच्या माघारीनंतर कोकणातील विधान परिषद निवडणुकीतील रंगत ओसरली असून महायुतीला मोठा राजकीय लाभ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बाळ माने यांच्या सह अपक्ष उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. तसेच अनिल चोपडा व मानसी म्हात्रे यांनी देखील आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले.