रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील मोठा पेच अखेर सुटला आहे. शिंदे सेनेचे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. या घडामोडीमुळे संभाव्य मतविभाजनाचा धोका टळल्याचे मानले जात आहे.
जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता वाढली होती. स्थानिक पातळीवरील नाराजीचे हे रूपांतर निवडणुकीतील बंडखोरीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी पडद्यामागे हालचाली वेगाने सुरू केल्याचे सांगितले जाते.
अखेरीस वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर जुईली दळवी यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्या स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने अधिकृत सूचकाने हजर राहून अर्ज मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, या प्रक्रियेवर महायुतीच्या नेत्यांचे बारकाईने लक्ष होते. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर राहून त्यांनी घडामोडींवर लक्ष ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुईली दळवी यांच्या माघारीनंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीतील संभाव्य मतफूट रोखण्यात यश आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता महायुतीची संपूर्ण ताकद अधिकृत उमेदवाराच्या प्रचारामागे उभी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, या घडामोडीमुळे विरोधकांच्या राजकीय गणितावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात अखेर बंडखोरी शमल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
