अलिबाग : कोकणात ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीमेला यंदा मोठे यश प्राप्त झाले आहे. यंदाच्या हंगामात तब्बल १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिल्लांना संवर्धन करून सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे. वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि स्थानिक कासव मित्र संघटना यांच्या मदतीने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासव संवर्धन मोहीम राबविण्यात आली होती.
कुठे राबविण्यात आली ही मोहीम?
ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत २०२५- २६ हंगामात कोकणातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम राबविण्यात आली. यात एकूण १ हजार ७२४ कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल १ लाख ०८ हजार ५९६ कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे या हंगामात उबवण यशाचे प्रमाण ६१.२० टक्के नोंदविण्यात आले आहे.
कोकणातील कासव संवर्धन मोहीमेचे यश कसे?
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ९६४ घरटी नोंदविण्यात आली असून, त्यामधून ५४ हजार २२७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७३८ घरट्यांमधून ५३ हजार ३२५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले असून, ६९.९५ टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले. रायगड जिल्ह्यात २२ घरट्यांमधून १ हजार ०४४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. कोकण किनारपट्टीवरील कासव संवर्धन मोहीमेचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे.
पहिल्यांदाच घरटी कुठे?
यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे, पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांची घरटी नोंदविण्यात आली. यावरून महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या प्रजननासाठी अजूनही महत्त्वपूर्ण अधिवास मानले जात आहे.
कासवांच्या घरट्यांचे संवर्धन कसे होते ?
साधारण नोव्हेंबर ते मार्च हा काळ कासवांच्या प्रजननाचा असतो. या काळात भरतीच्या वेळी मादी रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येतात. पाण्यापासून अंदाजे ५० ते ८० मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करून मादी अंडी घालतात. या खड्डयावर पुन्हा वल्ह्यासारख्या पायांनी रेती लोटून ती समुद्रात निघून जातात. या मादी अंडी घालून समुद्रात परत गेल्या, की कासवांच्या संवर्धनाचे काम सुरू होते. ही अंडी विशिष्ट पद्धतीने वाळूत खड्डा करून ठेवली जातात. साधारणपणे ४५ ते ६५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर यायला लागतात. अंड्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाते. वनविभागाच्या कांदळवन कक्षाचे कर्मचारी स्थानिक कासव मित्रांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडतात.
कासव संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली ज्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. स्थानिक सामाजिक संस्थाचा सहभाग यात महत्वाचा आहे. विशेष म्हणजे कासव संवर्धन मोहिमेत दरवर्षी नवनवीन समुद्रकिनाऱ्याची भर पडत आहे.
- कांचन पवार, उपवनसंरक्षक कांदळवन कक्ष
