रत्नागिरी – कोंकण रेल्वे मार्गावरील दिवाण- खवटी ते विन्हेरे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मंगला एक्सप्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळेसाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर एक तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी १२६१८ मंगला एक्सप्रेस ही गाडी गोव्याच्या दिशेने जात असताना अचानक कॅटेल गार्ड मेटल गार्डवर आदळला. या धक्क्याची जाणीव होताच मोटारमनने तत्परता दाखवत गाडी तात्काळ थांबवली. तसेच याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी जाऊन झालेला बिघाड दूर करण्यात आला.

मोटारमनच्या माहितीवरून तांत्रिक पथक घटनास्थळी तातडीने दाखल होऊन तपासणी दरम्यान कॅटेल गार्ड मेटल गार्डमध्ये अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले. तो कापून हटवणे आवश्यक होते. त्यामुळे तिथेच अत्यंत काळजीपूर्वक कॅटेल गार्ड कापून काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत तांत्रिक पथकाने हा अडथळा दूर केला. यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाले नाही.

ही घटना तात्पुरती असली तरी मोटारमनच्या तत्काळ निर्णयक्षमतेने आणि तांत्रिक पथकाच्या तत्पर कारवाईने मोठा अनर्थ टळला. कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी या घटनेचा कोंकण रेल्वेच्या नियमित वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे सांगीतले. हा अडथळा कमी वेळात दूर करून हा मार्ग सामान्य करण्यात आला असल्याने इतर गाड्यांची वेळापत्रकेही बदलण्याची गरज भासली नाही. तांत्रिक अडथळा असूनही प्रशासनाने दाखवलेली दक्षता आणि जलद प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घटनेनंतर प्रवासी आणि स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले असून मंगला एक्सप्रेस पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ करण्यात आली.