कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत समाविष्ट करून कोकण रेल्वेचा विकास साधावा अशी मी संसदेतही मागणी लावून धरली, तसेच कोकण रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाविरोधातही आवाज उठविला होता, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी समिती गठित करण्यात आली आहे, या समितीने मंगला एक्स्प्रेससह अन्य रेल्वे गाडय़ांना सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, टर्मिनस होईल तेव्हा होईल, पण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रेल्वेना थांबा द्यावा, असे या शिष्टमंडळाने खासदार राऊत यांना सांगून निवेदन दिले. या शिष्टमंडळात अध्यक्ष जगदीश मांजरेकर, डी. के. सावंत, पुखराज पुरोहित, आनंद नेवगी, बाळ बोर्डेकर तसेच पदाधिकारी या शिष्टमंडळात होते. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी या शिष्टमंडळाची मागणी ऐकून घेतली. खासदार विनायक राऊत म्हणाले, कोकण रेल्वे महामंडळ बरखास्त करून भारतीय रेल्वेत महामंडळ समाविष्ट करावे, अशी लोकसभेत मागणी केली आहे. तसेच कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या विरोधातही आवाज उठविला, असे खासदार राऊत म्हणाले. या मागणी संदर्भात माझ्यासह पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक एकत्रित रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधू. सावंतवाडी स्थानकावर टर्मिनस होत आहे, तेथे प्रमुख जलद गाडय़ांनादेखील थांबा मिळावा म्हणून आग्रही राहू. याकरिता लवकरच आपली मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्याचे आश्वासन दिले.