सावंतवाडी : कोकणची समृद्ध निसर्गसंपदा, पर्यावरण आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ‘राखणदार सेवा संघा’तर्फे सुरू असलेल्या ‘राखणदार पदयात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जकात नाका येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जल, जंगल, जमीन आणि पर्यावरण रक्षणासाठी कोकणी माणूस एकवटला असून, गावागावांत या पदयात्रेचे जंगी स्वागत केले जात आहे.

​सध्या सर्वत्र जल, जमीन आणि जंगल झपाट्याने नष्ट होत असल्याने गावां समोर मोठे संकट उभे राहिले आहे. निसर्गरम्य कोकण भकास होण्याच्या मार्गावर असून हे संकट दूर करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि जागृत नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या गावाच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतः ‘राखणदार’ बनण्याची गरज या पदयात्रेच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

​या पदयात्रेदरम्यान पर्यावरण रक्षणावर आधारित विविध प्रबोधनात्मक गीते, घोषणा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मळेवाड परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि आपला गाव शाबूत ठेवण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. केवळ घोषणा न देता प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीतून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले. या उपक्रमाला मळेवाड परिसरातील अबालवृद्धांसह बहुसंख्य ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

कोकणातील विकासाची ब्ल्यू प्रिंट सत्यात उतरेल असे जनतेला वाटत होते. पण सध्या पर प्रांतातील गुंतवणूकदारांनी जमिनी मध्ये गुंतवणूक वाढविली आहे. त्यामुळे कोकणी संस्कृती, परंपरा, निसर्ग सौंदर्याचा रास होईल असे चित्र निर्माण झाले आहे. तसेच वृक्षतोड करत सपाटीकरण केले जात आहे. कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्यात येत आहे. पुर्वजानी रक्षण करून ठेवलेल्या जमिनी, संस्कृतीचे महत्त्व राखणदार यात्रेत रानमाणूस म्हणून ओळख निर्माण केलेले प्रसाद गावडे गाऱ्हाणे आणि शब्दात मांडताना पहायला मिळत आहेत.