सावंतवाडी : ‘गाव सोडूचो नाय, जंगल तोडूचो नाय… माय माती सोडूचो नाय, लडाय सोडूचो नाय…’ अशा कोकणी पर्यावरण रक्षणाच्या गाण्यांच्या गजरात आणि आपले जंगल, जमीन वाचवण्यासाठी नागरिकांनीच ‘राखणदार’ बनले पाहिजे, असा संदेश देत मालवणमध्ये ‘राखणदार पदयात्रा’ मोठ्या उत्साहात पार पडली. ‘रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसाद गावडे आणि त्यांच्या टीमच्या पुढाकाराने ही पदयात्रा काढण्यात आली होती.

​सिंधुदुर्गात गावागावात स्थानांचे रक्षण करणारे जसे राखणदार देवस्थाने आहेत, त्याच धर्तीवर जंगल, जमीन, नद्या, समुद्र, प्राणी-पक्षी वाचवण्यासाठी आणि आपली पारंपरिक संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी स्वतः नागरिकांनीच राखणदार बनून पुढे आले पाहिजे, या उद्देशाने जिल्हाभरात ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

​विविध धार्मिक स्थळांना भेटी अन् संवाद

वायरी मोरेश्वर किनाऱ्यावरील ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ देवस्थान येथे गाऱ्हाणे घालून या पदयात्रेला सुरुवात झाली. किनाऱ्यावरून वाटचाल करत दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर, दांडेश्वर मंदिर, आणि गवंडीवाडा येथील गणेश येशू मंदिराला भेट देऊन गाऱ्हाणे घालण्यात आले.यानंतर पदयात्रेने बाजारपेठेत प्रवेश केला. तेथील मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेत्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर मेढा भागातील पिराच्या दर्ग्याला भेट देऊन मुस्लिम बांधवांशी पर्यावरण रक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​या प्रवासादरम्यान पारंपरिक मच्छिमारांशी संवाद साधून अनधिकृत व अतिरेकी मासेमारी विरोधातील त्यांच्या लढ्याची माहिती घेण्यात आली. समुद्र व सागरी जीवांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत पारंपरिक मच्छिमारांनी या पदयात्रेला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

​राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या आज्ञापत्राचे वाचन:

पदयात्रेचा समारोप राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून झाला. याप्रसंगी शिवरायांच्या जल, जंगल आणि जमीन रक्षणाविषयक ऐतिहासिक ‘आज्ञापत्रा’चे वाचन करण्यात आले.या पदयात्रेत राखणदार टीमचे सदस्य, वाढवण बंदर प्रकल्प विरोधी समितीचे पदाधिकारी, मालवणमधील ‘इकोमेट्स’ व ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ या संस्थांचे सदस्य, पारंपरिक मच्छिमार तसेच मुंबई व जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.