मुंबई: कोकण प्रवासातील वेळ आणि पैसा वाचवणारी आरामदायक अशी मुंबई ते विजयदुर्ग रो रो जलवाहतूक सेवा चार दिवसापूर्वी सुरु झाल्यानंतर या समुद्र मार्गावरील जयगड, देवगड, आणि वेंगुर्ला या तीन बंदरांवरील रो रो सेवा महिन्याभरात (गुढीपाडवा) सुरु होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून या बंदरांवर जेट्टी बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुंबई ते रेवस मांडवा (अलीबाग) या समुद्र मार्गावर आठ वर्षापूर्वी रो रो बोट सेवा सुरु झाल्यानंतर कोकणासाठी एक मार्च रोजी ही सेवा सुरु झाली. ४० चारचाकी, आणि २५ दुचाकी वाहनांसह ६२५ प्रवासी क्षमता असलेल्या या रो रो बोटीमधून एक मार्च रोजी ३०० प्रवाशांनी प्रवास केला. कोकणातील नोकरदार व पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या या सेवेचे कोकणातील बंदरात ठिकठिकाणी थांबे व्हावेत, अशी मागणी कोकणवासियांची आहे. त्यासाठी मेरीटाईम बोर्डाने जयगड, देवगड आणि वेंगुर्ला येथे जेट्टी उभारण्याच्या कामांना सुरुवात केली असून महिन्याभरात ह्या जेट्टी बांधून तयार होतील, असे राणे यांनी सांगितले.
बिट्रिश काळात रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग, आणि गोव्यापर्यंत जहाज सेवा होती. या जहाजातून मालवाहतूकही केली जात असल्याने हापूस आंब्याच्या व्यापारासाठी कोकणवासियांना फायदेशीर होते. चार दिवसापूर्वी सुरु झालेली रो रो सेवा मुंबईत हापूस आंबा आणण्यास उपयोगी ठरणार आहे. हापूस आंब्याच्या वाहतूकीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या सेवेचे कोकणातील थांबे गुढीपाडव्यापर्यंत तयार करण्याचे मेरीटाईम बोर्डाचे नियोजन आहे. जयगड येथील थांबा हा औद्योगिकदृष्टया उपयोगी ठरणार आहे. सणासुदीला (होळी आणि गणेशोत्सव) कोकणात जाणारा नोकरदार आणि पर्यटकांना या थांब्यामुळे फायदा होणार आहे. मुंबई गोवा रस्ते मार्गावर जाणारा दहा ते बारा तासाची वेळ तीन ते पाच तासाने कमी होणार आहे. चार दिवसापूर्वी सुरु झालेल्या रो रो बोट सेवेचा तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. हा दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. या प्रवासातील इकाॅनामीतील तिकिट दर दोन हजार ५०० आहे. सोबत घेऊन जाणाऱ्या वाहनांचा वेगळा आकार द्यावा लागणार आहे. हा दर चारचाकीसाठी सहा हजार तर दुचाकीसाठी एक हजार रुपये आहे. या रो रो सेवेनंतर मेरीटाईम बोर्डाकडून नेरुळ ते मुंबई पर्यंतची बंद पडलेली जलवाहतूक सेवा सुरु केली जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
