राजापूर : शासनाच्या महत्वाकांक्षी फळबाग लागवड योजनेचा फायदा घेत कोकणातील शेतकर्‍यांनी अनके आंबा-काजूच्या बागायती विकसित केल्या आहेत; मात्र, गेल्या दशकभरामध्ये सातत्याने वातावरणामध्ये झालेल्या बदलांचा आंबा-काजूला फटका बसत आहे. कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला तरी, उत्पादनातील घट थांबताना दिसत नाही. हवामान बदलाचा कमी परिणाम होणार्‍या आणि वर्षाकाठी दोनवेळा हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या सुपारी बागायतीकडे कोकणातील शेतकरी वळत आहे. मात्र सुपारीच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. यांमुळे सुपारी बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सुपारीचे नुकसान शासनदरबारी उपेक्षितच राहिलेली आहे. 

अतिवृष्टी अन् वादळांचा परिणाम

वादळे आणि अतिवृष्टीचा सुपारीवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सोसाट्याच्या वार्‍यामध्ये सुपारीची झाडे सातत्याने जोरजोरात हेलकावे खातात. अतिवृष्टीमध्ये झाडांच्या मुळाच्या ठिकाणी निचरा होणारी जमीन नसल्यास तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे ती कमकुवत होतात. सुपारीच्या झाडाचे नुकसान दोन-तीन वर्षानंतर दिसून येते. झाड मरण्याचे प्रमाण वाढते. गेल्या चार-पाच वर्षामध्ये सातत्याने कोकण किनारपट्टीवर आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा परिणाम आता दिसत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

कोळेरोगाचा प्रादुर्भाव अन् फळगळतीने हैराण

हमखास उत्पन्न मिळवून देणार्‍या आंबा-काजू पिकावरील वाढलेले किडरोग हे बदलत्या वातावरणाचा परिणामच मानला जातो. तुलनेत सुपारी हे पीक काहीसे सुरक्षित परंतु, मागील पाच-सहा वर्षामध्ये सुपारी पीक बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूवहात अडकल्याचे चित्र समोर आले आहे. उन्हाळ्यात तापमान वाढ आणि पावसाळ्यात अतिवृष्टी अशा समस्येमुळे रस शोषून घेणारी बुरशी, कोळेरोगांचा प्रादुर्भाव वाढून सुुपारी परीपक्व होण्याअगोदरच गळून पडली.

यावर्षी पावसाने कहर करताना तब्बल सात महिने बरसला. अतिवृष्टीमुळे बुरशी आणि कोळेरोगांचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव वाढला. सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांना किडरोग नियंत्रणासाठी किटकनाशक वा बुरशीनाशकांची फवारणी करता आली नाही. जी औधष फवारणी केली गेली ती पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे फळगळतीला झालेली सुरूवात पाऊस गेल्यानंतर वाढली. त्यामध्ये साधारणतः ८० टक्के फळगळती झाली. त्यातून, मोठ्या आर्थिक संकटामध्ये बागायतदार सापडला असून भविष्यात असेच वातावरण राहील्यास सुपारी पिकांचे करायचे काय ? अशा विवंचनेत तो सापडला आहे. 

माकडांचा उपद्रव कायम

जंगलतोड आणि जंगलामध्ये पुरेसे न मिळणारे अन्न यामुळे माकडे मानवी वस्तीकडे वळले. घर परिसरातील नारळ, सुपारी बागांमध्ये माकडांचा वावर वाढला. गेल्या तीन चार वर्षामध्ये लाल तोंडाच्या माकडांचा त्रास सुपारीला होऊ लागला आहे. ही माकडे सुपारीचे फळ चावून सालातला रस खातात. तसेच रस शोषून घेणारी बुरशी, कोळींचा प्रादुर्भाव वाढून सुपारी परिपक्व होण्याअगोदरच गळून पडली. यावर्षी अधिक काळ झालेल्या वृष्टीमुळे बुरशी आणि कोळेरोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला. कीटकनाशक वा बुरशीनाशकांची फवारणी करता आली नाही. औधष पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे फळगळती पाऊस गेल्यानंतर वाढली. त्यामध्ये साधारणतः ८० टक्के फळगळती झाली.

अपेक्षित फळधारणा नाही

मुबलक पाण्याच्या ठिकाणी लागवड केली व दर दोन महिन्यांनी पूरक खते दिली तर लागवडीनंतर ७ ते १० वर्षांनी उत्पन्न मिळण्यास सुरवात होते. सुपारीच्या एका झाडाचे आयुष्य सुमारे ५० वर्ष असते. वर्षातून एकदा एका झाडापासून एका हंगामामध्ये १.५ ते २ किलो वाळलेली सुपारी मिळते. मात्र, बदलते हवामान, अतिवृष्टी, किड रोगाचा प्रादुर्भाव, वन्यजीवांचा त्रास आदी विविध कारणामुळे सुपारीचे उत्पादन घटताना ते निम्म्यापेक्षा अधिक कमी झाले आहे. काही भागामध्ये तर सरासरी वीस ते पंचवीस टक्के उत्पादन आले आहे.